कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या ऐतिहासिक खांबावरील बल्बची रोषणाई, तसेच मंजूळ स्वर उद्या, रविवारी देवीच्या रथोत्सवाच्या निमित्ताने उजळून निघणार आहे. अंबाबाई मंदिर परिसर सुशोभीकरणातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांचे आगमन होताच त्यांचे मन प्रसन्न व्हावे, त्यांच्या कानावर देवीच्या स्तोत्राचे मंजूळ स्वर पडावेत, दर्शनाचे एक आध्यात्मिक समाधान लाभावे, म्हणून मंदिर परिसरात ध्वनी यंत्रणा उभारली आहे. त्याचा शुभारंभ उद्या, रविवारी रथोत्सवाच्या निमित्ताने होत आहे.देशभरातील अनेक प्रमुख देवस्थानच्या, तसेच मंदिरांच्या परिसरात ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून भक्तिगीते, देवीचे स्तोत्र, आरती लावली जात आहे. तिरुपती देवस्थानमार्फत तिरुमला डोंगरावर बालाजीचे गीत ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून लावले जाते. हाच अनुभव आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांना येणार आहे.मंदिर परिसरातील दोनशे ते तीनशे मीटर परिघात ऐतिहासिक खांबावर बल्ब लावण्यात आले असून, तेथूनच देवीचे स्तोत्र, आरती, भक्तिगीते भाविकांना ऐकायला मिळणार आहेत. त्यासाठी ऐतिहासिक पद्धतीचे १२० खांब उभारण्यात आले आहेत. वॉर्मव्हाइट बल्ब या खांबांवर बसविले असून, त्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्यही खुलणार आहे.ध्वनीयुक्त खांब उभारणीचे काम मुंबईतील कृष्णा रेफ्रिजरेशन कंपनीने केले आहे. या कंपनीने अयोध्या येथील राम मंदिर, मधुरा यासह मुंबईत अशा पद्धतीचे काम केले आहे. हेरिटेज बल्बचे खांब उभारण्याचे काम पवन क्विक सर्व्हिसेस कंपनीने केले आहे.मूळ कल्पना राजेश क्षीरसागर यांचीराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची ही मूळ कल्पना आहे. त्यासाठी त्यांनी ध्वनीयुक्त हेरिटेज खांबांसाठी २ कोटी ६५ लाखांचा खर्च आला असून, हा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे.
Kolhapur: अंबाबाई मंदिर परिसर उद्यापासून विद्युत दिव्यांनी उजळणार, देवीच्या स्तोत्रांचे मंजूळ स्वर निनादणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:03 IST