राज्यातील दोनशे बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु, 'या' दिवशी होणार मतदान
By राजाराम लोंढे | Updated: September 6, 2022 18:14 IST2022-09-06T18:08:45+5:302022-09-06T18:14:20+5:30
कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगूपर बाजार समित्यांसाठी २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.

राज्यातील दोनशे बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु, 'या' दिवशी होणार मतदान
कोल्हापूर : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील दोनशे बाजार समित्यांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आज, मंगळवारी पुन्हा सुरु करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यानुसार मतदार यादीची प्रक्रिया सुरु होणार असून २३ डिसेंबरला निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगूपर बाजार समित्यांसाठी २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.
कोरोनामुळे मार्च २०२० पासून राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणूका घेता आलेल्या नव्हत्या. मध्यंतरी सहकारी संस्थांच्या निवडणूका सुरु झाल्या, त्यानुसार बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रियाही सुरु करण्यात आली. मतदार याद्या मागवण्याचे कामही सुरु झाले. मात्र एका विकास संस्थेने औरंगाबाद खठपीठात याचिका दाखल करुन विकास संस्थांच्या निवडणूका घेतल्याशिवाय समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करु नये, अशी मागणी केली.
त्यानुसार खंडपीठाने ऑगस्ट २०२२ पर्यंत स्थगिती देत विकास संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले. विकास संस्थांच्या निवडणूका झाल्यानंतर न्यायालयाने समित्यांची प्रक्रिया सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कार्यक्रम जाहीर केला.