तीन कारखान्यांच्या निवडणुकीचा बिगुल
By Admin | Updated: February 9, 2015 00:37 IST2015-02-09T00:05:49+5:302015-02-09T00:37:12+5:30
जिल्ह्याचा पश्चिम भाग : साखर सह. संचालक कार्यालयात संभाव्य निवडणुकीच्या आराखड्यावर आज चर्चा

तीन कारखान्यांच्या निवडणुकीचा बिगुल
प्रकाश पाटील - कोपार्डे -राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कुंभी-कासारी (कुडित्रे), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) व भोगावती (परिते) या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. संभाव्य निवडणूक आराखड्यासाठी प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर येथे कारखाना प्रशासनाबरोबर नियोजनात्मक दृष्टीने चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलाविली आहे. येत्या मे ते जून महिन्यापर्यंत जिल्ह्याच्या पश्चिम भागातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.
जिल्ह्यातील कुंभी-कुडित्रे, दूधगंगा-वेदगंगा (परिते), भोगावती (परिते) या साखर कारखान्यांमध्ये आजी-माजी आमदारांच्या सत्ता आहेत. विधानसभेला ‘कुंभी’चे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांना यश मिळविताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, तर ‘बिद्री’चे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. या तिन्ही साखर कारखान्यांमध्ये राजकीय सांगड असून, राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून या तिन्ही साखर कारखान्यांच्या निवडणुकीकडे पाहिले जाते.
कुंभी-कासारी कारखान्यावर दहा वर्षांपासून नरके यांची निर्विवाद सत्ता आहे, तर त्यांनी ‘भोगावती’त राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षाला बरोबर घेऊन आपले विधानसभेचे विरोधक पी. एन. पाटील यांना सत्तेतून पायउतार करताना दोनवेळा आमदारकीही काबीज केली आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते राजकीय ईर्ष्येने पेटून उठले आहेत. त्यादृष्टीने कुंभी-कासारी व भोगावतीमध्ये राजकीय समीकरणे व ध्रुवीकरण करण्यास पी. एन. पाटील गट सक्रिय झाला आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार प्रकाश आबिटकर यांना सहकारी म्हणून घेण्यास काँग्रेस कार्यकर्ते उत्सुक आहेत.
‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी पी. एन. पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी चंद्रदीप नरके यांना मदत केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राधानगरीमध्ये के. पीं.च्या विरोधात भूमिका घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांना बळ देत विजयी केले. आता बिद्रीच्या राजकारणातही के. पीं. विरोधात आबिटकर अशी ताकद उभा करून पी. एन. पाटील यांच्या विरोधात विधानसभेला केलेल्या विरोधी खेळीचा वचपा काढण्याचाही काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे.
तिन्ही कारखान्यांची राजकीय सांगड असल्यामुळे येत्या काळात कारखान्यांच्या निवडणुकीतून करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, कागल या सहा तालुक्यांतील राजकीय वातावरण तापणार आहे.