सातार्डे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २२ उमेदवार निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:58+5:302021-01-13T05:04:58+5:30
यवलूज :सातार्डे (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची होत असून, एकूण नऊ जागांसाठी दोन अपक्षांसह एकूण ...

सातार्डे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २२ उमेदवार निवडणूक
यवलूज :सातार्डे (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची होत असून, एकूण नऊ जागांसाठी दोन अपक्षांसह एकूण २२ उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. गावपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पॅनलप्रमुखांनी आपल्या गटाच्या उमेदवारांच्या विजयासाठी अनोखी व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे या वेळची ही निवडणूक सर्वांसाठी अंतिम टप्प्यांवर अटीतटीची व प्रतिष्ठेची बनली आहे. एक एक मताच्या गोळाबेरजेसाठी प्रत्येक प्रभागातील उमेदवार सध्या मतदारांच्या घराचे उंबरे झिजवतानाचे चित्र दिसून येत आहे.
गावात एकूण तीन प्रभागात २३७० मतदारसंख्या असून, ग्रामपंचायत सदस्यांची संख्या नऊ आहे. ही निवडणूक स्थानिक पातळीवरील गटनेत्यांच्या विचारातून निर्माण केलेल्या स्थानिक आघाड्यांमधून थेट एकमेकांविरुद्ध लढवली जात असली तरी एका प्रभागात मात्र जनसुराज्यचे गटनेते मधुकर पाटील यांनी आपला वेगळा सुभा मांडला आहे. यामध्ये पांडुरंग पाटील ग्रामविकास आघाडीचे प्रत्येक प्रभागात तीन असे एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत, तर हनुमान ग्रामविकास आघाडीचे तीन प्रभागात नऊ उमेदवार उभे आहेत, शिवाय प्रभाग दोनमध्ये ग्रामदैवत हनुमान ग्रामविकास पॅनलचे दोन उमेदवार या प्रभागात प्रतिस्पर्ध्यासमोर आपले कडवे आव्हान निर्माण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावताना दिसून येत आहेत. याच बरोबर प्रभाग एक व दोनमध्ये प्रत्येकी एक अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. अपक्षांनीही या निवडणुकीत खरी रंगत आणली असून, प्रभाग तीनमध्ये दुरंगी तर प्रभाग दोनमध्ये तिरंगी व दोन अपक्ष अशी काटा-जोड लढती होत आहेत.