बळिराजाच्या मुळावर ‘एल-निनो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 00:29 IST2015-04-22T23:31:38+5:302015-04-23T00:29:34+5:30
‘एल-निनो’ प्रवाह म्हणजे काय ?

बळिराजाच्या मुळावर ‘एल-निनो’
वीरकुमार पाटील - कोल्हापूर
सर्वत्र उन्हाचा तडाखा बसत असतानाच अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हातातोंडाशी आलेली रब्बीची पिके मातीत मिसळून गेली. या पावसाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांचे आता सारे लक्ष यंदाचा मान्सून कसा असेल याकडे आहे. त्यातच हवामान अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने यावर्षीच्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा प्रभाव राहणार नसल्याने सरासरीच्या १0२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून सरासरीच्या ९३ टक्के पडेल, असा अंदाज वर्तविलाआहे. या पार्श्वभूमीवर ‘एल-निनो’ आणि त्याचा प्रभाव याविषयी...
असा पडतो प्रभाव
जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान तीन महिने ०.५ ते ०.९ सेल्सिअसपर्यंत वाढते आणि पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढतो. तेव्हा पश्चिमेकडून पूर्वेस वारे वाहतात आणि ढग जमलेली पाण्याची वाफ तिकडे वाहून नेतात. तेव्हा पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती निर्माण होते.
‘एल -निनो’चा परिणामसतत तीन महिने समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्यामुळे प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्याचा परिणाम हिंदी महासागरातील थंड वाऱ्याची दिशा बदलून ते दक्षिण अमेरिकेकडे वळतात. असे घडले तर त्यावर्षी भारतात पाऊस कमी पडतो. कमी पावसामुळे खरिपाचे उत्पन्न घटत असल्यामुळे अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो.
गतवर्षीही या प्रवाहाचा परिणाम दिसला; मात्र तो फार काळ टिकला नाही. जूनमध्ये प्रशांत महासागरात तापमान घटल्याने ‘एल-निनो’ प्रवाह ६० टक्के तयार झाला होता. त्यामुळे हा महिना कोरडा गेला; मात्र जुलै मध्ये तापमान घटल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे पश्चिमेकडे वाहायला लागले आणि पावसाने जोर धरला.
‘एल-निनो’ प्रवाह
म्हणजे काय ?
एल-निनो स्पॅनिश शब्द आहे. अमेरिकेतील पेरू आणि इक्वाडोर किनाऱ्यालगत प्रशांत महासागरात विषुववृत्ताजवळ अचानक उष्ण पाण्याचा प्रवाह वाहतो, त्याला ‘एल-निनो’ प्रवाह म्हणतात. हा प्रवाह साधारणपणे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला वाहायला सुरूहोतो.
इतिहास...
१९५० ते २०१२ या ६२ वर्षांतील पहिल्या ३२ वर्षांत भारतातील मान्सूनवर ‘एल-निनो’चा प्रभाव नव्हता.
नंतरच्या ३१ वर्षांत याचा परिणाम सात वेळा दिसून आला. त्यातही १९९७ नंतर तीन वेळा ‘एल-निनो’चा अतिशय प्रभावी परिणाम जगभर जाणवला. त्यामुळे मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला.
२००२ मध्ये मध्यम प्रभावी ‘एल-निनो’ दिसला.
२००४ मध्ये ‘एल-निनो’मुळे भारतात १२ टक्के सरासरीपेक्षा पाऊस कमी.
२००९ मध्ये या प्रावाहमुळे सरासरीपेक्षा २१ टक्के पाऊस कमी.
२०१२ मध्येही सरासरीच्या आठ टक्के पाऊस कमी.
सन १९५७-५८, १९६५-६६, १९७२-७३, १९८२-८३, १९८७-८८, १९९७-९८ ही ‘एल-निनो’ प्रभावी असणारी वर्षे होती.