घरफाळा घोटाळाप्रकरणी आणखी आठजण चौकशीच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:35 IST2020-11-04T16:34:25+5:302020-11-04T16:35:23+5:30
kolhapur, muncipaltyCarporation, कोल्हापूर महानगरपालिकेतील गाजत असलेल्या घरफाळा घोटाळाप्रकरणी आणखी आठ कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असून त्यांना आज, बुधवारी कारणे दाखवा नोटीस लागू होण्याची शक्यता आहे.

घरफाळा घोटाळाप्रकरणी आणखी आठजण चौकशीच्या भोवऱ्यात
कोल्हापूर : महानगरपालिकेतील गाजत असलेल्या घरफाळा घोटाळाप्रकरणी आणखी आठ कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असून त्यांना आज, बुधवारी कारणे दाखवा नोटीस लागू होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेत सध्या घरफाळा विभागातील घोटाळा गाजत असून त्याला वैयक्तिक राजकारण, हेवेदावे, कर्मचारी संघातील वर्चस्ववाद अशी अनेक कारणे कळीचा मुद्दा बनली आहे. एकीकडे नगरसेवक भूपाल शेटे तर दुसरीकडे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून काही प्रकरणे समोर आणली आहेत. मात्र, त्यात काही कर्मचाऱ्यांचा संबंध नसतानासुद्धा सापडले जाऊ लागले आहेत.
निलंबित करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर यापूर्वीच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घरफाळा घोटाळ्यात एकूण अठरा प्रकरणे समोर आली, परंतु त्यापैकी चार प्रकरणांची चौकशी होऊन कारंडे व अन्य तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली; पण चौदा प्रकरणांची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
नगरसेवक शेटे यांनी बुधवारी आयुक्त कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन अन्य दोषींवरसुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली. चौकशी समितीने आठ कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आज, बुधवारी आणखी आठ कर्मचाऱ्यांना उपायुक्त निखिल मोरे यांच्यामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कर्मचारी संघाचे पदाधिकारीदेखील असतील.