‘यशवंत’च्या बिनविरोधासाठी प्रयत्न

By Admin | Updated: November 9, 2016 00:53 IST2016-11-09T00:25:14+5:302016-11-09T00:53:11+5:30

सत्ताधारी गटाच्या हालचाली : विरोधक शांतच, नोकरभरतीचा मुद्दा येणार ऐरणीवर

Efforts to oppose 'Yashwant' | ‘यशवंत’च्या बिनविरोधासाठी प्रयत्न

‘यशवंत’च्या बिनविरोधासाठी प्रयत्न

कोपार्डे : मागील वेळी मोठ्या चुरशीने झालेल्या कुडित्रेच्या श्री यशवंत सहकारी बँकेची निवडणूक यंदा बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीकडे विरोधकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांत फूट पडली नाही तर ‘यशवंत’ची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणूक संस्थापक अध्यक्षांच्या विरोधात बंड झाल्याने मोठ्या चुरशीने झाली; पण यात संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील (शिंगणापूरकर) यांचा अडीच ते तीन हजार मतफरकाने पराभव करत अ‍ॅड. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले होते.
जिल्हा कार्यक्षेत्र असणारी श्री यशवंत सहकारी बँक कुंभी-कासारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यांतील प्रमुख अर्थवाहिनी समजली जाते. या बँकेच्या माध्यमातूनच करवीर विधानसभा व कुंभी-कासारी साखर कारखान्यातील आ. चंद्रदीप नरके गट सक्रिय आहे.
मागील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली असताना अचानक किरकोळ मुद्द्यावरून बोलणी फिस्कटल्याने निवडणूक लागली होती. तसेच बँकेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील हे आ. नरके गटाकडे झुकल्याने यशवंत मंचच्या नेत्यांनी आपले विरोधी पॅनेल उभा केले. त्यावेळी इतर मागास प्रवर्गातील संस्थापकांचा एकमेव उमेदवार बिनविरोध निवडून आला, अन्यथा अ‍ॅड. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे उमेदवार २५०० ते ३००० मतांच्या फरकांनी निवडून आले होते.
बँकेचा कारभार देसाई यांच्या हातात आला त्यावेळी बँक तोट्यात होती. बँकेची आसुर्ले-पोर्ले शाखा तोट्यात असल्याने ती शाखा बंद करावी, अशी मागणी सभासदांनी केली होती. मात्र, याला बगल देत अत्यंत काटेकोर कारभार करून त्यांनी बँक फायद्यात आणली. चालू अहवाल वर्षात बँकेने ७० लाखांचा नफा मिळविण्यासह आॅडिट वर्ग ‘अ’ मिळविण्यात सातत्य राखले आहे. याच अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने आणखी दोन शाखा उघडण्यास परवानगी दिल्यामुळे बँकेचे दहा शाखांमध्ये विस्तारीकरण झाले आहे.
सध्या बँकेची २०१६ ते २०२१ साठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यमान संचालक मंडळाने यशवंत मंच अबाधित ठेवण्यासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. आ. नरके यांनी बंधू अजित नरके यांच्या नेतृत्वाखाली कुंभी बँकेची निवडणूक बिनविरोध करून निवडणूक खर्चापासून बँकेला वाचविले आहे. त्यामुळे यशवंत बँकेतील निवडणुकीबाबत त्यांना कोणतीच उत्सुकता नसल्याचे स्पष्ट आहे.
त्यातच संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील (शिंगणापूरकर) हेही शांत असून, आगामी काळात विद्यमान संचालकांमध्ये फूट पडली तरच ‘यशवंत’च्या बिनविरोध निवडीला अडचणी निर्माण होणार आहेत, अन्यथा ही बँकही कुंभी-कासारी बँकेप्रमाणे बिनविरोधच्या वाटेवर असून तशा राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.


नोकर भरतीमुळे संचालकांना विरोध ?
सध्या संगणकीय प्रणालीद्वारे नोकर भरतीवर चाप लावून बँकेचा खर्च वाचविता आला असता. त्यामुळे अहवाल सालात बँकेचा नफा एक कोटीवर गेला असता; पण विद्यमान संचालकांनी आपल्या सग्यासोयऱ्यांची नोकर भरती करून मोठा आर्थिक बोजा वाढविल्याचा सूर येत आहे. यामुळेच विद्यमान संचालकांबाबत नाराजी आहे.

Web Title: Efforts to oppose 'Yashwant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.