शिक्षणासाठी सुरू आहे ‘त्यांना’ जीवघेणा संघर्ष
By Admin | Updated: August 13, 2014 23:31 IST2014-08-13T21:03:16+5:302014-08-13T23:31:05+5:30
गुडघाभर चिखलातून पायपीट : दररोज दोन तासांचा करावा लागतोय प्रवास- वानरमारे समाजाची साडेसाती : भाग - २

शिक्षणासाठी सुरू आहे ‘त्यांना’ जीवघेणा संघर्ष
राम करले -- बाजार भोगाव -- खांद्यावर अडकलेली फाटकी पिशवी, पावसाच्या संरक्षणासाठी अंगावर घेतलेला फाटका कागद, डोंगर-दऱ्यातील वेड्यावाकट्या पायवाटेतून गुडघाभर चिखलातून दररोजची पायपीट... रोजचा दोन तासांचा पायी प्रवास रोजचं ‘मरण’ देत आहे. मात्र, चांगल्या भविष्यासाठी जिवावर टांगती तलवार घेऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.
वानरमारे कुटुंबातील पाच विद्यार्थी पोंबरे प्राथमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. शाळा ते डोंगरातील छप्पर असा दोन तासांचा चार कि. मी.चा रोजचा पायी प्रवास करावा लागतो. प्रवासादरम्यान चार नाले, एक ओढा आहे. पावसाचा जोर वाढला की, अलीकडे-पलीकडे जाणे कठीण असते. त्यावेळी पाणी कमी झाल्यावर विद्यार्थी एकमेकांच्या हातात हात घालून ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. दगडावर मोठ्या प्रमाणात निसरट असते. अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते. शाळेत गेलेल पोरं पुन्हा छप्पराकडे सुरक्षित येईल का? ही एकच चिंता वानरमारे कुटुंबाना सतावत असते. मात्र, भविष्याचा विचार करून मनावर दगड ठेवून आई-वडील त्यांना शाळेत पाठवितात. मुलांची दयनीय अवस्था पाहून ‘बिचारी’ म्हणून अनेकजण कळवळा असल्याचे बोलून दाखवितात. मात्र ‘मदत’ करून माणुसकीचे दर्शन देण्यास असमर्थपणा दाखविला जातो. गावातील घरातील त्यांची वस्ती निर्माण केली, तर संघर्ष न करता विद्यार्थ्यांना आपलं आयुष्य घडविता येईल.
पोंबरेतील वानरमारे प्रती एका कुटुंबाला घरासाठी दोन, तर शेतीसाठी अठरा गुंठे अशी एकूण वीस गुंठे जमीन मोफत देण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. तसेच मोफत घरे बांधून देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
- प्रशांत पिसाळ,
तहसीलदार, पन्हाळा