डायनॅमिक अ व जयहिंद अ या संघांना संयुक्त विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:56+5:302021-01-13T05:00:56+5:30
इचलकरंजी : १९ वर्षांखालील मुलांच्या खो खो स्पर्धेत डायनॅमिक अ आणि जयहिंद अ यांच्यातील अंतिम सामना अटीतटीचा झाला. तांत्रिक ...

डायनॅमिक अ व जयहिंद अ या संघांना संयुक्त विजेतेपद
इचलकरंजी : १९ वर्षांखालील मुलांच्या खो खो स्पर्धेत डायनॅमिक अ आणि जयहिंद अ यांच्यातील अंतिम सामना अटीतटीचा झाला. तांत्रिक कारणामुळे खेळ थांबल्याने नियमानुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. शिरोळ तालुका खो खो असोसिएशनने तृतीय क्रमांक पटकाविला. डायनॅमिक स्पोर्ट्सने या खो खो स्पर्धेचे आयोजन केले होते. डायनॅमिक स्पोर्ट्स मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात जयहिंद अ विरुद्ध सरस्वती आणि डायनॅमिक अ विरुद्ध शिरोळ तालुका खो खो असोसिएशन यांच्यात उपांत्य सामने खेळले गेले. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने चुरशीने झाले. चारही संघांच्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन घडविले. अखेर डायनॅमिक अ आणि जयहिंद अ या संघांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.
डायनॅमिक स्पोर्ट्स अ विरुद्ध जयहिंद अ यांच्यातील अंतिम लढत रंगतदार झाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्याचे प्रयत्न केले; पण काही तांत्रिक कारणामुळे हा सामना अंतिम टप्प्यात थांबविला. त्यामुळे या दोन्ही संघांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. शिरोळ तालुका संघ यांच्यात मिनीमम चेस पद्धतीने लढत होऊन त्यामध्ये शिरोळ तालुका संघाने विजय संपादन करत तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेनंतर विजेत्या संघांना आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, नगरसेवक मदन कारंडे, सुनील पाटील, शशांक बावचकर, प्रकाश दत्तवाडे, हरिष बोहरा, पुंडलिक जाधव, भूषण शहा यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी इलेव्हन संघ विरुद्ध गंगामाई गर्ल्स् हायस्कूल या मुलींच्या संघाचा मैत्रिपूर्ण सामना खेळविण्यात आला.
स्पर्धेत व्यक्तिगट गटामध्ये उत्कृष्ट डायर- आदित्य खुणे (डायनॅमिक अ), उत्कृष्ट संरक्षक- मुस्तफा बागवान (जयहिंद अ), उत्कृष्ट आक्रमक - ऋषिकेश शिंदे (सरस्वती), अष्टपैलू- रोहन कोरे (डायनॅमिक अ) आणि प्ले अवॉर्ड- चंद्रकांत कांबळे (शिरोळ तालुका) यांना गौरविण्यात आले.
डायनॅमिक स्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय कुडचे यांनी स्वागत व कार्यवाह शेखर शहा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास भाऊ आडसूळ, दत्तात्रय कित्तुरे, अमोल लंगोटे, डॉ. भूषण काळे आदींसह क्रीडारसिक उपस्थित होते.
(फोटो ओळी)
११०१२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजी येथील खो खो स्पर्धेत डायनॅमिक अ व जयहिंद अ या संघांना संयुक्त विजेतेपदाचे पारितोषिक आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संजय कुडचे, अहमद मुजावर, भूषण शहा, नगरसेवक सुनील पाटील, शेखर शहा उपस्थित होते.