महापुराच्या काळात सामाजिक संस्थांनी लढवली खिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST2021-08-15T04:25:46+5:302021-08-15T04:25:46+5:30
अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेने महापुराच्या नियोजनासाठी पावसाळ्यापूर्वी बैठका घेतल्या. पूर परिस्थितीचे नियोजन केले परंतु ...

महापुराच्या काळात सामाजिक संस्थांनी लढवली खिंड
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेने महापुराच्या नियोजनासाठी पावसाळ्यापूर्वी बैठका घेतल्या. पूर परिस्थितीचे नियोजन केले परंतु प्रत्यक्षात महापूर आल्यानंतर चहा-नाष्ट्यापासून ते दोनवेळचे जेवण, आरोग्यसेवा, जनावरांना चारा, पूर ओसरल्यानंतर जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप हा संपूर्ण भार विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनीच पेलला. नगरपालिकेने आपत्तीत काहीच खर्च केला नाही. त्यामुळे श्रीमंत असलेल्या नगरपालिकेचा कारभार निवांतच राहिला.
दोन वर्षांत दोनवेळा इचलकरंजी शहराला महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. २०१९ साली नगरपालिकेने सेंट्रल किचन सुरू केले. विविध सामाजिक संस्था व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. यंदा मात्र महापुराच्या आपत्तीत पालिका नामानिराळीच राहिली. नगरपालिकेच्या शाळा मोकळ्या करून त्या ठिकाणी पूरग्रस्त छावण्या निर्माण करून देण्यापलीकडे पालिकेने काहीच केले नाही. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध व्यक्ती व सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. २०१९ पासून महापूर त्यानंतर २ वर्षे कोरोना या सर्व आपत्कालीन परिस्थितीत यथाशक्ती मदत करणाऱ्या संस्थांनीच या महापुराचा भार सोसला.
शहरातील विविध भागात पाणी शिरल्याने त्या परिसरातील ४ हजार ५२३ कुटुंबातील सुमारे २५ हजार नागरिक स्थलांतरित झाले होते. त्यातील नगरपालिकेच्या १८ छावण्यांमध्ये १७ हजार नागरिक आसरा घेत होते. या सर्वांचा चहा-नाष्टा, जेवणाची सोय विविध सामाजिक संस्था, व्यक्तींनी केली. त्यामध्ये राहुल खंजिरे (१२00), तेलनाडे फौंडेशन (३५00), आमदार प्रकाश आवाडे (२५00), सागर चाकळे (१२00), मनोज साळुंखे (५00), नागेश शेजाळे (लहान मुलांसाठी दूध, नाष्टा), मारवाडी समाज (३00) आणि वैद्यकीय मदत डॉ. कोरे व तेेलनाडे फौंडेशन याशिवाय आवश्यकतेनुसार आवाडे समर्थ ग्रुप व माणुसकी फौंडेशन यांच्या वतीने जेवण पोहोच केले जात होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था व कार्यकर्ते इतर मदतीसाठी तत्पर होते. पूर ओसरल्यानंतर घरी परतणाऱ्या कुटुंबांना गहू, तांदूळ व जीवनावश्यक वस्तूचे किट वाटपही शहरासह बाहेरून विविध संस्थांनी मदत केली. त्याचबरोबर पूरग्रस्त परिसरातील स्वच्छता मोहिमेतही सहभाग घेतला.
चौकट - कोरोना आपत्तीतही पालिकेची भूमिका जेमतेम
नगरपालिकेने दोन ठिकाणी कोविड केंद्र सुरू केले. अनेकवेळा या केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला. नाष्टा व जेवण याच्या दर्जाकडेही दुर्लक्ष झालेे. आरोग्य सभापतींनाच अनेकवेळा पालिकेच्या पदाधिकाऱ्याबरोबर हुज्जत घालावी लागली. त्यामुळे श्रीमंत नगरपालिकेच्या आशा लक्षणाला काय म्हणावे ? असा सवाल उपस्थित होत आहे.