बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 07:42 IST2025-11-23T07:41:42+5:302025-11-23T07:42:15+5:30
बिबट्याच्या हल्ल्यांमुळे लोकांच्या राहणीमानात आता बदल होत आहेत. शेतकऱ्यांनी जनावरांचे गोठे बंदिस्त केले आहेत. जनावरे चारायला सोडणे बंद केले आहे.

बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
सरदार चौगुले
पन्हाळा (जि. कोल्हापूर) : जंगलात मुक्तसंचार करणाऱ्या बिबट्याचा अधिवास लोकांनी धोक्यात आणल्यानंतर बिबट्याने मानववस्तीत शिरकाव करून लोकांची झोप उडवून टाकली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराकडच्या लोकवस्ती पाळीव प्राण्यावर हल्ला करून त्यांना भक्ष्य बनवत आहे. भविष्यात बिबट्या नरभक्षक होण्यास वेळ लागणार नाही. यावर गांभीर्याने विचारमंथन होणे गरजेचे आहे. जसे बिबट्याने जगण्यासाठी आपले राहणीमान बदलले तसे मानवाने सुद्धा बिबट्यापासून संरक्षणासाठी आपले राहणीमान बदलण्यास सुरूवात करणे गरजेचे आहे.
बिबट्याच्या अधिवासावर हस्तक्षेप झाल्याने त्याने उसाच्या फडात मुक्काम ठोकला. दिवसभर उसाच्या फडात राहायचे, तर रात्री लोकवस्तीतील पाळीव प्राण्यांना भक्ष्य करायचे, हा त्याचा नित्यक्रम मोठी समस्या होऊन बसली आहे. कोणताही हिंस्त्र प्राणी मानवावर विनाकारण हल्ला करत नाही. त्याला धोका अगर अधिवासात उपद्रव केला तरच तो हल्ला करतो म्हणून बिबट्याशी संघर्ष करणे टाळले पाहिजे.
बिबट्याच्या हल्ल्यांमुळे लोकांच्या राहणीमानात आता बदल होत आहेत. शेतकऱ्यांनी जनावरांचे गोठे बंदिस्त केले आहेत. जनावरे चारायला सोडणे बंद केले आहे. डोंगराकडच्या गावातील लोक रात्री-अपरात्री एकटेदुकटे फिरत नाहीत. जंगल किंवा बिबट्याचा वावर असणाऱ्या रस्त्यावर लोक प्रवास टाळत आहे. शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे मुश्किल होत आहे. पिकांना रात्री सोडा दिवसाही पाणी पाजण्याचे धोक्याचे ठरत आहे.
पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या डोंगराकडेला माझा जनावरांचा गोठा आहे. बिबट्याने गोठ्यातील राखणीवर कुत्रे मारल्यावर गोठा बंदिस्त केला. जनावरे चारायला सोडायची बंद केली. बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर जनावरे पाळणे बंद करावे लागेल.- ऋषिकेश बाबा शिंदे, आसुर्ले, ता.पन्हाळा
लोकांनी आपले राहणीमान बदलणे गरजेचे आहे. गोठे बंदिस्त करावे, टाकाऊ अन्नाची योग्य विल्हेवाट लावावी, शेतात खाली वाकून किंवा बसून काम करणे धोक्याचे आहे. - प्रदीप सुतार, वन्यजीव बचाव पथक प्रमुख, कोल्हापूर