करव्यवस्थेतील शिथिलतेमुळे आर्थिक विकास कुंठित
By Admin | Updated: April 2, 2016 00:40 IST2016-04-02T00:28:56+5:302016-04-02T00:40:29+5:30
एन. डी. पाटील : जे. एफ. पाटील यांच्या ‘चलननीती’चे प्रकाशन

करव्यवस्थेतील शिथिलतेमुळे आर्थिक विकास कुंठित
कोल्हापूर : आर्थिक शिस्त ही सर्व व्यवस्थेचा कणा आहे, तर आर्थिक तूट ही मधुमेहासारखी असते. देशाचा आर्थिक विकास व उत्पन्नवाढ कुंठित होण्याचे कारण करव्यवस्थेतील शिथिलतेमध्ये आहे. त्यामुळे सरकारच्या हातात पुरेसा पैसा येत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील लिखित ‘चलननीती’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या सेमिनार हॉलमधील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग आणि इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीने लेखक डॉ. पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, देशात अब्जाधीशांची संख्या मोठी असूनही अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षणावर आवश्यक त्या प्रमाणात निधी खर्च होत नाही. सरकारचा पैसा प्रामुख्याने व्याज, वेतन आणि अनुदान यावर खर्ची पडत असल्याने विकासाला कमी निधी उपलब्ध होतो. हे चित्र बदलण्यासाठी सरकारने करव्यवस्था अधिक उत्पादक करावी. त्यातून मिळणारे उत्पन्न अधिकतर शिक्षण, आरोग्य, आदी सामाजिक क्षेत्रांवर खर्च करावे. अर्थशास्त्रीय विचार विविध वर्तमानपत्रांतील लेखांच्या माध्यमातून डॉ. पाटील यांनी समाजापर्यंत पोहोचविले आहेत. ‘चलननीती’तून त्यांनी आर्थिक प्रश्न, व्यवहार सर्वसामान्यांसमोर आणले आहेत.
डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, अर्थशास्त्रीय लिखाणाचा छंद मी गेल्या ४५ वर्षांपासून जोपासला आहे. यातून असंख्य विद्यार्थ्यांना लिखाण, वक्तृत्वाची प्रेरणा देऊन शकलो, याचे मोठे समाधान आहे. ‘चलननीती’ हे पुस्तक देशाच्या अर्थकारणाची दिशा व विविध आर्थिक प्रश्नांशी सांगड व्यक्त करणारे आहे.
डॉ. शिंदे म्हणाले, अर्थशास्त्रीय नियोजन करण्यासाठी ‘चलननीती’ मार्गदर्शक ठरणारे आहे. सर्वसामान्यांना अर्थनीती वापरता यावी यासाठी समजणाऱ्या शब्दांत अर्थशास्त्र सांगण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थतज्ज्ञ, अभ्यासकांनी योगदान द्यावे. सध्याच्या चलननिर्मिती, चलननीतीमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी उपाययोजना सुचविणे आवश्यक आहे.
कार्यक्रमास डॉ. ज. रा. दाभोळे, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, प्राचार्य टी. एस. पाटील, डॉ. भारती पाटील, अनिल पडोसी, कमल पाटील, पी. ए. कोळी, जे. एस. पाटील, भालबा विभूते, संजय ठिगळे, आर. जी. दांडगे, शशिकांत पंचगल्ले, आदी उपस्थित होते. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांनी पुस्तक परिचय करून दिला. समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. एम. एस. देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
करसवलतीचा मात्र गाजावाजा नाही
शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सार्वजनिक चर्चेत येते. मात्र, उद्योगांना मोठ्या प्रमाणात दिलेल्या करसवलतीचा फारसा गाजावाजा होत नसल्याचे प्रा. एन. डी. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, सन २००८ मध्ये प्रथम शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली. त्याच वर्षी उद्योगांना २ लाख ३९ हजार कोटींच्या करसवलती दिल्या होत्या. शिवाय एअर इंडिया प्रकल्पाला सात हजार कोटींची तूट दरवर्षी येते. हा पैसा करदात्यांचा असतो. सर्वसामान्यांच्या एस. टी.ला येणारा तोटा सामाजिकदृष्ट्या समर्थनीय आहे. मात्र, ‘एअर इंडिया’चा तोटा समर्थनीय नाही.