सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

By Admin | Updated: July 11, 2017 00:54 IST2017-07-11T00:54:31+5:302017-07-11T00:54:31+5:30

सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

Due to the sowing crisis in Sangli, Satara | सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट

सांगली, साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट


राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आतापर्यंत ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी गेल्या आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने पाठ फिरविल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट अद्याप नसले तरी सांगली व सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी पट्ट्यात मात्र हे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर येण्याची शक्यता आहे. प्राथमिक आढाव्यानुसार सांगली व सातारा जिल्ह्णांत सुमारे ३६०० हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बळिराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्णात यंदा ‘रोहिणी’ नक्षत्र काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरीप पेरणीस गती आली; पण ‘मृग’ नक्षत्र कोरडे गेल्याने काही ठिकाणी उगवणी झाल्या नव्हत्या. ‘आर्द्रा’ नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने या काळात काही भागातील प्रलंबित पेरण्या पूर्ण झाल्या. पिकांची उगवणही चांगली झाली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार हेक्टरवर (५७ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यातील भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या असून भाताच्या १ लाख ८ हजारपैकी ६० हजार हेक्टर तर नागलीच्या २१ हजारांपैकी केवळ १५०० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी दुबार पेरणीसारखे संकट येईल, अशी परिस्थिती दिसत नाही.
सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व व त्यानंतरच्या काळात पाऊस जोरदार झाल्याने मशागत लवकर सुरू होऊन गतवर्षीच्या तुलनेत पेरण्यांना गती मिळाली. २ लाख ७८ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर (४७ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १५ दिवसांत २९३ मिलीमीटर (५० टक्के) पाऊस झाल्याने खरिपाची उगवण चांगली झाली आहे. महाबळेश्वरमुळे जिल्ह्याची पावसाची टक्केवारी वाढत असली तरी यंदा विशेषत: माण, खटाव, कोरेगावचा दुष्काळी पट्टा या तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत ४० टक्क्यांपेक्षा कमीच पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा पेरण्या चांगल्या झाल्या आहेत पण गेले दहा दिवस आकाश कोरडे पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. माण, खटाव तालुक्यात खरीप ज्वारी व बाजरीचे क्षेत्र येथे जास्त असून पावसाअभावी पेरण्या थांबल्या आहेत. ज्या पिकांची उगवण झाली ती पाण्याअभावी करपू लागल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे आहे.
सांगली जिल्ह्यात यंदा २ लाख ९१ हजारांपैकी १ लाख २९ हजार हेक्टरवर (४४ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. ‘आर्द्रा’ नक्षत्र काळात शिराळा, वाळवा, मिरज, जत, आटपाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने खरिपाची उगवणही झाली.
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी दहा दिवसांत १०५ मिलीमीटर (२७ टक्के) पाऊस झाला आहे. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सर्वच तालुक्यांतील पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून पलूस,
तासगांव , आटपाडी ,खानापूर,कडेगाव तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
एकंदरीत पावसाने हुलकावणी दिल्याने तिन्ही जिल्ह्णांतील पिकांचा जीव गळ्यापर्यंत आला आहे. कोल्हापूर जिल्ह्णात दुबार पेरणीचे अद्याप संकट नसले तरी भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या आहेत. सांगली व सातारा जिल्ह्णांत मात्र दुबार पेरणीचे संकट दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तिन्ही जिल्ह्णांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा सध्यातरी पुरेशा असल्याने पाणीटंचाईचे संकट फारसे दिसत नाही.
उसावर किडीचा प्रादुर्भाव!
कोल्हापूर विभागात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून ३ लाख ४ हजार हेक्टरवर ऊस आहे. अद्याप पाऊस चांगला असल्याने पिके जोमात असली तरी उघडिपीमुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीस पोषक असे वातावरण असल्याने माव्यासह तांबेऱ्याने उसाची पाने भरली आहेत.
जिल्हा पेरणी हेक्टर पाऊस मिलीमीटर
कोल्हापूर १ लाख ५१ हजार ३५०.९
सांगली १ लाख २९ हजार १०५.६
सातारा १ लाख ३२ हजार २९३.०

Web Title: Due to the sowing crisis in Sangli, Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.