कृष्णेच्या मोजमापामुळे महापुराचा धोका समजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:28+5:302021-02-05T07:08:28+5:30
शिरोळ : कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजण्याची प्रक्रिया केंद्रीय जल आयोगाकडून सुरू झाली आहे. सोळा दिवसांमध्ये १४० किलोमीटर ...

कृष्णेच्या मोजमापामुळे महापुराचा धोका समजणार
शिरोळ : कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजण्याची प्रक्रिया केंद्रीय जल आयोगाकडून सुरू झाली आहे. सोळा दिवसांमध्ये १४० किलोमीटर नदीचे मोजमाप करण्यात येणार आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व महापुराचा इष्ट, अनिष्ट परिणाम शिवाय संभाव्य पूर व अतिवृष्टीबरोबरच महापुराचा धोका या मोजमाप प्रक्रियेमुळे फलदायी ठरणार आहे.
भारतातील सर्वच नद्यांवर केंद्रीय जल आयोगाची केंद्रे आहेत; पण २००५ व २०१९ च्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापुराचा हाहाकार उडाला होता. त्यादृष्टीने नदीची खोली व रुंदीचे मोजमाप अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवर्षी हे मोजमाप केले जाते. कनवाड-म्हैसाळ बंधाऱ्यापासून मोजमाप करण्यास सुरुवात झाली असून, आलास, जुगुळ, यडूर, देसाई इंगळी, मडवाळ, कुडुची, गुंडवाड, सबसागर, दरूर, जमखंडी, आरंगी-हिप्परगी डॅम, कटकोळ, गलगले, आदी ठिकाणी कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजली जाणार आहे.
कृष्णेच्या उगमापासून समुद्रापर्यंतचे प्रतिवर्षी चार पथकांमार्फत मोजमाप केले जाते; पण महाराष्ट्र व कर्नाटकातील कृष्णेच्या महापूर पट्ट्यातील हे पथक मोजमाप करणार आहे. त्यामुळे हे मोजमाप अत्यंत महत्त्वाचे आहे. शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडपासून कर्नाटकातील अलमट्टी धरणापर्यंत १४० किलोमीटरच्या अंतरावर ४० ठिकाणे निश्चित केली आहेत. ज्याठिकाणी ब्रीज आहे, त्याठिकाणी मशीनद्वारे पाण्याची पातळी मोजली जाते. नदीपात्रात माती व वाळू किती निघून गेली आहे, याची देखील तपासणी केली जात आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत अर्जुनवाडपासून अलमट्टी धरणापर्यंत पथकामार्फत कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजमाप करण्यात येणार आहे. या पथकात कनिष्ठ अभियंता रूपेश कुमार यादव, एन. जी. हिपिरे, उद्धव मगदूम, एम. बी. कांबळे, प्रकाश कुंभार, माणिक चौगुले, एम. आर. नलवडे, हरीष पवार यांचा समावेश आहे.
............
कोट
जनतेच्या व पाण्यातील जीवसृष्टीच्या हिताच्या दृष्टीने हे मोजमाप अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्रीय जल आयोगाकडून दरवर्षी हे मोजमाप केले जाते.
- उद्धव मगदूम, कुशल कार्यसहायक
फोटो - ०१०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - केंद्रीय जल आयोगाकडून कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.