गट-तटामुळे कॉँग्रेसची सत्तास्थाने खालसा
By Admin | Updated: July 10, 2017 00:56 IST2017-07-10T00:56:14+5:302017-07-10T00:56:14+5:30
गट-तटामुळे कॉँग्रेसची सत्तास्थाने खालसा

गट-तटामुळे कॉँग्रेसची सत्तास्थाने खालसा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये उघड-उघड दोन गट पडले असून नेत्यांमधील विसंवादाने मात्र कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. एकेकाळी जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या काँग्रेसची एक-एक सत्तास्थाने खालसा झाली आहेत. प्रदेशाध्यक्षांचा धाक नाही आणि जिल्ह्यात कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही. दुभंगलेले नेते आणि खचलेली काँग्रेस अशीच अवस्था कोल्हापुरात पाहावयास मिळत आहे.
पुरोगामी विचारांचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या भूमीने नेहमीच काँग्रेस विचाराला पाठबळ दिल्याने जिल्हा काँग्रेसमय होता. दोन्ही काँग्रेसची फाळणी होण्याअगोदर जिल्ह्याचे दोन्ही खासदार व बारापैकी किमान दहा आमदार हे काँग्रेसचे होते. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद, बहुतांशी पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका, गोकुळ ही सगळी सत्तास्थाने पक्षाच्या ताब्यात होती, इतकी नाळ घट्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सन १९९९ मध्ये जिल्ह्यात पक्षाची पडझड झाली. तत्कालिन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, खासदार सदाशिवराव मंडलिक, दिग्विजय खानविलकर दिग्गज मंडळींनी रामराम केल्याने अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अंगावर घेऊन जिल्हाध्यक्षपद कोणी घ्यायचे, असा प्रश्न होता. त्यावेळी पी. एन. पाटील यांच्या गळ्यात माळ पडली. त्यांनी उर्वरित नेत्यांना सोबत घेत पक्षाची ताकदीने बांधणी केली; पण ‘गोकुळ’वगळता फारशी सत्तास्थाने ताब्यात राहिली नाहीत. याउलट दोन खासदार, अर्धा डझन आमदार, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, बाजारसमितीसह (पान १ वरुन) बहुतांशी पंचायत समित्यांची सत्ता राष्ट्रवादीकडे होती. त्यानंतर राष्ट्रवादीशी संघर्ष करत पक्षाचे अस्तित्व अबाधित राखले, पण सन २००९च्या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत राजकारणातून पाडीपाडीने काँग्रेसचा घात झाला. ‘दक्षिण’मधून सतेज पाटील तर ‘शिरोळ’मधून सा. रे. पाटील हे निवडून आले. जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, मालोजीराजे छत्रपती हे दिग्गज पक्षातंर्गत राजकारणास बळी पडले. सतेज पाटील यांना गृहराज्यमंत्री म्हणून संधी मिळाली, त्यांनी पक्षाची पाळेमुळे पसरविण्याचा प्रयत्न केला, पण अंतर्गत कलहाने त्यांना मोकळीक मिळाली नाही. सन २०१४ ला तर पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आले. ऐनवेळी राष्ट्रवादीने साथ सोडल्याने पक्षाला उमेदवार शोधताना दमछाक झालीच पण एकही जागा निवडून आली नाही. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसची पाटी कोरी राहिली.
यानंतर नेत्यांना थोडे शहाणपण येईल, निवडणुकीत झालेल्या चुका सुधारत एकदिलाने नेते काम करतील आणि पक्षाला पुन्हा गतवैभव आणतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. काँग्रेसचा गड ढासळत शिवसेना व भाजप जोरदार मुसंडी मारत असताना त्याला सांघिकपणे विरोध झाला नाही. महापालिकेच्या सन २०१५ च्या निवडणुकीत कॉँग्रेसची सगळी सूत्रे सतेज पाटील यांनी हातात घेतली; पण तत्कालीन काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांनी ‘ताराराणी’ आघाडीच्या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत पी. एन. पाटील यांचीही भूमिका नरो वा कुंजरोवा अशीच राहिली. तरीही सतेज पाटील यांनी २९ नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आणत राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतरच्या विधान परिषद निवडणुकीत महादेराव महाडिक, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. सतेज पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर महाडिक यांनंी बंडखोरी केली. राष्ट्रवादी पाठीशी राहिलीच पण कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिल्याने आवाडे यांनी साथ दिल्याने सतेज पाटील यांचा विजय झाला. त्यानंतर सतेज पाटील यांनी कॉँग्रेसची सूत्रे ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. अगोदरच आवाडे व पी. एन. पाटील यांच्या वाद त्यात जिल्हाध्यक्षपदाचा दिलेला ‘शब्द’ न पाळल्याने सतेज पाटील व आवाडे यांच्यात संघर्ष सुरू झाला.
शाहूवाडीत कर्णसिंह गायकवाड हे विनय कोरे यांच्या सोबत असल्याने पक्ष अस्तित्वहीन आहे. पन्हाळ्यात तर कार्यकर्त्यांची केविलवाणी अवस्था आहे. आवाडे-आवळेंच्या वादाने हातकणंगलेमधील काँग्रेस खिळखिळी झाली आहे. करवीर व राधानगरी तालुका सोडला तर जिल्ह्यात कॉँग्रेसची अक्षरश: वाताहात झाली आहे. कागलमध्ये तर औषधालाही कॉँग्रेस राहिलेली नाही. गडहिंग्लजमध्ये यापेक्षा वेगळी अवस्था नाही. कर्जमाफीवरून भाजपला कोंडीत पकडण्याची नामी संधी काँग्रेसला आली होती. सतेज पाटील यांनी मोर्चा काढला पण त्यात पी. एन. पाटील कोठेच दिसत नव्हते. पी. एन. पाटील व सतेज पाटील अशा दोन गटांत कॉँग्रेस विभागल्याने कार्यकर्ते अस्वस्थत आहेत.
एकीकडे भाजप सत्तेचा वापर करून ग्रामीण भागात पाळेमुळे रोवत असताना काँग्रेसची घट्ट रोवलेली मुळे नेत्यांमधील अंतर्गत वादाने कमकुवत होत आहेत. मध्यावधी निवडणुका झाल्यातर काँग्रेसच्या हाताला फारसे लागेल अशी परिस्थिती सध्या नाही.
‘भरमू’,‘बजूण्णा’चे राजकारण
‘गोकुळ’ भोवतीच
चंदगड तालुक्यात कॉँग्रेसकडे भरमूण्णा पाटील व दिवंगत नरसिंगराव पाटील यांचे गट आहेत; पण या दोघांचेही राजकारण कॉँग्रेसपेक्षा ‘गोकुळ’ म्हणजेच महाडिक यांच्या भोवतीच फिरत असल्याने पक्षवाढीवर येथे मर्यादा आहेत. भुदरगडमध्ये बजरंग देसाई यांचे सुपुत्र राहुल यांनी भाजपमध्ये जाऊन विधानसभेची तयारीही सुरू केली आहे; पण बजरंग देसाई अद्याप कॉँग्रेसमध्येच आहेत. त्यांचेही राजकारण ‘गोकुळ’वरच अवलंबून आहे.
गणपतरावांचे गटालाच महत्त्व!
शिरोळ तालुकाध्यक्ष अनिल यादव यांनी पक्षातंर्गत कुरघोडीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेसची सारी भिस्त गणपतराव पाटील यांच्यावर आहे. जिल्हा पातळीवरील निवडणुकीत फारसे लक्ष न देता स्थानिक राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी जुळवून घेऊन पक्षापेक्षा गटालाच ते अधिक महत्व देत आहेत.
‘महाडिक इफेक्ट’ कारणीभूत
गेली २५ वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर महादेवराव महाडिक यांचा प्रभाव राहिला आहे. प्रत्येक तालुक्यात त्यांची त्रास देण्याइतकी ताकद आहे. ही ताकद ‘गोकुळ’च्या माध्यमातून उभी केली आहे. महाडिक हे पक्षीय विधिनिषेध बाळगणारे नाहीत. ते बारा तालुक्यांत बारा भूमिका घेऊ शकतात. चिरंजीवांना भाजपच्या माध्यमातून आमदार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने महाडिक आणि पी. एन. यांच्यात फाटेल असा ‘भाबडा’आशावाद अनेकांना होता. मात्र, या दोघांनीही आपला दोस्ताना कायम असल्याचे सिद्ध केले आहे. ‘गोकुळ’मधील बहुतांशी संचालक गावाकडे पक्षीय राजकारण करतात आणि राजाराम कारखान्याकडे जाताना ते महाडिकमय होऊन जातात. त्यामुळे या सर्वांची भूमिका ‘आप्पा’ सांगतील ते अशीच राहताना दिसत आहे.