पाचवी मुलगी झाल्याने ‘नकुशी’ला सोडले
By Admin | Updated: May 22, 2016 01:01 IST2016-05-22T01:01:47+5:302016-05-22T01:01:47+5:30
आईची कबुली : ऋणमुक्तेश्वरजवळ सापडलेल्या ‘त्या’ नवजात बालिकेच्या आई-वडिलांचा ४८ तासांत छडा

पाचवी मुलगी झाल्याने ‘नकुशी’ला सोडले
कोल्हापूर : दोन मुलींनंतर तिसरा मुलगा झाला. त्यानंतर चौथी मुलगी झाली आणि पाचवा मुलगाच होईल, अशी आशा होती; परंतु, मुलगी झाली. तिचा सांभाळ आपला भाऊ करील, म्हणून तिला भावाच्या दारातच सोडून आल्याची कबुली ‘नकुशी’च्या आईने लक्ष्मीपुरी पोलिसांसमोर शनिवारी दुपारी दिली. हसीना रशीद सय्यद (वय ४०) व रशीद जब्बार सय्यद (४२, रा. शाहू कॉलेजनजीक, विचारेमाळ, कोल्हापूर) असे या नकुशीच्या आई-वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील एका बोळामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत दोन दिवसांची नवजात बालिका सापडली होती. तिच्या आई-वडिलांचा छडा पोलिसांनी ४८ तासांत लावला आहे.
असा लागला छडा
नवजात बालिकेला रस्त्यावर कोणी टाकले, ती कोणाची आहे याचा लक्ष्मीपुरी पोलिस रात्रंदिवस कसून शोध घेत होते. दोन दिवसांत पोलिसांनी शहरातील १६५ घरांमध्ये चौकशी केली. हा तपास सुरू असताना पोलिस हवालदार अजित वाडेकर यांना सदर बझार येथून एक फोन आला. विचारेमाळ येथे एका महिलेची प्रसूती झाली आहे; परंतु तिच्याजवळ बाळ मात्र दिसत नाही, असे त्यात म्हटले होते. वाडेकर यांनी फोन बंद करून काही क्षणांतच विचारेमाळ गाठला. या ठिकाणी हसीना व तिचा पती रशीद यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी आम्हाला बाळ झालेले नाही, असे उत्तर दिले. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता हसीना गर्भवती होती. तिची प्रसूती झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र पोलिसांनी दरडावून विचारताच सय्यद दाम्पत्याने कबुली दिली.
या नवजात बालिकेची प्रकृती स्थिर आहे. पोलिस आणि न्यायालयाच्या अहवालानंतर तिचा ताबा पालकांना देण्यात येईल.
- डॉ. शिशिर मिरगुंडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक,
सीपीआर, कोल्हापूर
गुरुवारी पहाटे मध्यवर्ती बसस्थानक येथे मुलीला घेऊन आले. त्यानंतर रिक्षाने ऋणमुक्तेश्वर मंदिर येथे आले. त्याठिकाणी भाऊ सलीम शेख याच्या दारात ठेवून गेले. पतीचा मुलगी सांभाळ्ण्याचा विरोध नव्हता.
- हसीना सय्यद, ‘नकुशी’ची आई
भारतीय दंडविधान संहिता कलम ३१७ प्रमाणे संशयित हसीना सय्यद व तिचा पती रशीद यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. या दोघांना त्यांची नोटीस दिली आहे. बाळाचा ताबा शासकीय महिला व बालकल्याण समितीकडे देणार आहे. बाळाच्या जीविताचे बरेवाईट झाल्यास आईवडिलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. - मनीषा गभाले, पोलिस
उपनिरीक्षक, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे.
सध्या ही बालिका बालकल्याण समितीच्या ताब्यात आहे. तिच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत. तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
- अतुल देसाई, सदस्य, बालकल्याण समिती.