विद्यार्थी नसल्याने जिल्ह्यातील डी. एड्. महाविद्यालयांना टाळे
By Admin | Updated: July 23, 2016 23:49 IST2016-07-23T23:01:13+5:302016-07-23T23:49:24+5:30
प्राध्यापकांवर बेकारीची कुऱ्हाड : चौदाशे जागांवर ५६० विद्यार्थ्यांचेच प्रवेश, अनुदानित संस्थांमधील अडचणीही भविष्यात वाढणार...लोकमत विशेष
विद्यार्थी नसल्याने जिल्ह्यातील डी. एड्. महाविद्यालयांना टाळे
अशोक डोंबाळे-- सांगली -मागील सात वर्षांपूर्वी शिक्षकाची नोकरी हमखास मिळवून देणारा अभ्यासक्रम अशी ओळख असलेल्या डी. एड्.ची क्रेझ आता पूर्णत: ओसरली आहे. सध्या या अभ्यासक्रमाचे नाव ‘डी. एल. एड्.’ असे केले आहे. जिल्ह्यातील ३४ डी. एल. एड्. महाविद्यालयात १४०० जागा असून, यंदा केवळ ५६० जागा भरल्या गेल्या आहेत. सर्व शैक्षणिक शुल्क भरण्याचे आमिष दाखवूनही विद्यार्थी फिरकत नाहीत. यामुळे खासगी विनाअनुदानित महाविद्यालये संस्थाचालकांनी बंद केली आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेतर्फे डी. एड्. हा अभ्यासक्रम घेतला जात आहे. १९९५ ते २००५ या कालावधित डी. एड्. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीचीही शंभर टक्के खात्री होती. यामुळे डी. एड्.ला प्रवेशासाठी खासगी विनाअनुदानित महाविद्यालये लाखोंचे शुल्क आकारत होती. अनेक संस्थाचालकांनी पैसे कमावण्याचे साधन म्हणूनच डी. एड्. महाविद्यालये काढली. शासनानेही मंजुरी देण्याचा सपाटाच लावला होता.
जिल्ह्यात २००५ पूर्वी डी. एड्.ची केवळ आठ ते दहा महाविद्यालये होती. त्यात दहा वर्षांत चोवीस महाविद्यालयांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातून वर्षाला १४०० विद्यार्थी डी. एड्. अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडू लागले. राज्यात वर्षाला पन्नास हजार विद्यार्थी बाहेर पडत होते. हा अभ्यासक्रम पूर्ण करून एवढ्या मोठ्याप्रमाणात विद्यार्थी बाहेर पडत असताना तेवढ्या प्रमाणात नोकऱ्या मात्र उपलब्ध झाल्या नाहीत. मागील दोन वर्षापासून तर शिक्षक भरतीवर बंदीच आहे. आता शासनाने या अभ्यासक्रमाचे नाव बदलून डी. एल. एड्. असे केले आहे. शिवाय, नोकरी लागण्यापूर्वी पात्रता परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी डी. एल. एड्. अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात डी. एल. एड्. अभ्यासक्रमाची आठ अनुदानित आणि २६ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांसाठी १४०० विद्यार्थ्यांच्या जागा मंजूर आहेत. यंदा केवळ ५६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
या जागाही अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी नोकरी टिकवण्यासाठी शैक्षणिक शुल्क भरण्याचे आमिष दाखवून भरल्या आहेत. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांची अवस्था अत्यंत वाईट असून, तेथील प्रवेशच झाले नाहीत. मागीलवर्षी ज्या महाविद्यालयात प्रथम वर्षाचे प्रवेश झाले आहेत, तेथील विद्यार्थी आता दुसऱ्या वर्षात गेले आहेत. त्यामुळे काही महाविद्यालये तेवढी सुरू आहेत. उर्वरित पंधरा ते वीस महाविद्यालये यावर्षी बंदच आहेत. सांगली व मिरज शहरामध्ये तीन अनुदानित महाविद्यालये असून, त्यापैकी एकाही महाविद्यालयात पूर्ण क्षमतेने प्रवेश झाले नाहीत.
चाळीस जागांपैकी वीस ते तीसच जागा भरल्या आहेत. विनाअनुदानित महाविद्यालये बंद झाल्यामुळे तेथील प्राध्यापकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड आली आहे. भविष्यात अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांचीही नोकरी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची खात्री नाही
राज्य शासनाने यावर्षीपासून डी. एल. एड्. अभ्यासक्रम प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची सोय केली आहे. या संकेतस्थळावरील अर्जामध्ये डी. एल. एड्. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकरीची शासन हमी देत नाही, अशी सूचना शासनाने टाकली आहे. या सूचनेमुळे महाविद्यालयांच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. संस्थाचालक अडचणीत आले असून, त्यांनी ही सूचना काढण्याची शासनाकडे मागणी केली आहे.