कोल्हापूर : जरगनगरकडून आर. के. नगरकडे निघालेल्या मद्यपी कारचालकाचे दुचाकीस्वारास उडवले. सोमवारी (दि. २२) रात्री नऊच्या सुमारास जरगनगर येथील शेवटच्या बसस्टॉपजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दारूच्या नशेत कार चालवणारा अभिजित बाळकृष्ण कडोले (वय ४७, रा. आर. के. नगर, पाचगाव) याला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक अभिजित कडोले हा पत्नीसह शहरात गेला होता. जरगनगरच्या दिशेने आर. के. नगरकडे घरी परतत असताना जरगनगर येथील शेवटच्या बसस्टॉपजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. समोरच्या दुचाकीला उडवून कार जवळच्या एका घरासमोर जाऊन थांबली. हा अपघात घडताच नागरिकांनी कारचालकास बाहेर ओढून किरकोळ मारहाण केली. त्यावेळी त्याने मद्यप्राशन केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, नवरात्रौत्सवातील दुर्गामातेच्या आगमन मिरवणुकीसाठी पोलिस जरगनगर येथे उपस्थित होते. अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मद्यपि कारचालकास ताब्यात घेतले. तसेच त्याची कार जप्त केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.दुचाकीस्वार किरकोळ जखमीया अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. कारने उडवल्यानंतर दुचाकीस्वार बाजूला फेकला गेल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातात दुचाकीचे आणि एका चिकन सेंटरच्या फलकाचे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Kolhapur: मद्यपी कारचालकाने दुचाकीस्वारास उडवले, कारचालक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:47 IST