धामणी प्रकल्प झाल्यास दुष्काळ संपेल
By Admin | Updated: November 23, 2015 00:12 IST2015-11-22T21:16:29+5:302015-11-23T00:12:02+5:30
पंधरा वर्षे काम रखडले : ३.८५ टी.एम.सी. क्षमता, तिन्ही तालुक्यांतील अपेक्षित लाभ क्षेत्र १४00 हेक्टर

धामणी प्रकल्प झाल्यास दुष्काळ संपेल
महेश आठल्ये --म्हासुर्ली -मुसळधार पाऊस, धो-धो वाहणारी धामणी नदी; मात्र एकही साठवण प्रकल्प नसल्याने उन्हाळ्यातील ३-४ महिने पाणीटंचाईच्या भीषण झळा सोसायच्या, दुष्काळाची थोडीशी दाहकता कमी करण्यासाठी धामणी नदीवर स्वखर्चाने मातीचे बंधारे बांधून पाणी पुरवून वापरायचे. कशीबशी शेती जगवायची. यात कर्जबाजारी होत भविष्याची दिवास्वप्ने रंगवायची. या चक्रव्यूहात ३-४ पिढ्या खर्ची पडल्या. त्यामुळे ऐंशीच्या दशकात जनतेतून या खोऱ्यात धामणी प्रकल्पाची मागणी झाली.
राही-कंदलगाव येथील कळसांद्रे या ठिकाणी धामणी नदीवर मध्यम प्रकल्पाच्या मागणीने जोर धरला. तत्कालीन आमदार यशवंत एकनाथ पाटील यांनी त्याचा पाठपुरावा केला. मात्र, सर्वेक्षणाशिवाय पुढे काय झाले नाही. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांच्या सहकार्याने या खोऱ्यात पाणी परिषदेद्वारे प्रकल्प चर्र्चेत राहिला. अखेर या प्रकल्पासाठी सर्वोदयी कार्यकर्ते आबा कांबळे, क्रांतिवीर कै. नागनाथअण्णा नायकवडी, प्रा. एन. डी. पाटील, आदींच्या नेतृत्वाखाली या खोऱ्यातील जनता रस्त्यावर उतरली. गुराढोरा-बायकापोरांसह रस्ता अडविला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. यामुळे या प्रकल्पासाठी सरकारला दाद घ्यावी लागली. त्यातून ३.८५ टी.एम.सी. क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पास भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात परवानगी मिळाली. प्रत्यक्ष काम मात्र सुरू झाले नाही. तत्कालीन आमदार विनय कोरे, माजी आमदार संपतराव पवार यांच्या प्रयत्नाने १६ नोव्हेंबर २००० ला तत्कालीन मंत्री अजित पवार व अजितराव घोरपडे यांच्या हस्ते प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली.
सुरुवातीपासूनच या प्रकल्पाच्या कामात निधीची कमतरता, पुनर्वसनाचा प्रश्न, वनविभागाची आडकाठी, आदींमुळे या प्रकल्पाचे काम गेली १५ वर्षे रखडले आहे. मध्ये मध्ये विनय कोरे व माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील यांनी अडचणीवर मात करून काम सुरू ठेवले. मात्र, गेली पाच वर्षे सलग निधीअभावी व सिंचन घोटाळा, आदीमुळे काम बंद आहे. २०१० पासून निधीअभावी व सिंचन घोटाळ्यामुळे काम बंद आहे. मूळ १२0 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प ७५0 कोटींच्या पुढे गेल्याने या प्रकल्पाबाबत सांशकता निर्माण झाल्याने सध्या या प्रकल्पाची एस.आय.टी.मार्फत चौकशी सुरू आहे. राज्यातील मोजक्या काही संशयाची सुई दाखवणाऱ्या प्रकल्पांत याची गणना झाल्याने सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यास अडचण निर्माण झाल्याचे समजते.
पूर्ण उन्हाळ्यात या खोऱ्यास दुष्काळाचा सामना करावा लागत असून, धामणी मध्यम प्रकल्प त्या खोऱ्यात वरदाई ठरणार आहे. मुबलक आणि सुपीक जमीन असतानाही या खोऱ्यातील भूमिपुत्र वेठबिगार बनला आहे. ऊसतोड मजुरी, गुऱ्हाळघरावर काम, सेंट्रिंग काम, लाकूडतोड, कोकण प्रदेशात बागासफाई, आदी कामासाठी त्यास जावे लागत आहे. बेकारी आणि पैशाची चणचण यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर हजारो एकर जमीन बागायती होणार असून, या खोऱ्यातील शेतकरी दुष्काळ या दृष्टचक्रातून बाहेर पडणार आहे. सध्या या प्रकल्पाचे ६० टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून, पुनर्वसनाचा प्रश्नही बऱ्यापैकी सुटला आहे.
सध्या या विभागातून आमदार चंद्रदीप नरके व प्रकाश आबिटकर प्रतिनिधित्व करत आहेत. ‘धामणी’च्या पूर्णत्वासाठी येथील जनतेने त्यांना भरघोस मते दिली. शिवसेना पक्ष सत्तेत सहभागी असल्याने या दोन लोकप्रतिनिधींना प्रकल्प पूर्णत्वासाठी फारसं झगडावे लागणार नाही. थोड्याशा दबावानेही प्रश्न निकालात निघेल.
गेली १५ वर्षे या ना त्या कारणाने प्रकल्पाचे काम रखडल्याने या प्रकल्प पूर्णत्वानंतर हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार का दिवास्वप्न ठरणार? असा प्रश्न निर्माण होत असून, धामणीचे पूर्णत्व ही काळाची गरज बनली आहे.
गेली १५ वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. मी सतत या
प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्नशील असून, सिंचन घोटाळ्यामुळे हा प्रकल्पच चौकशीच्या फेऱ्यात अडकला असला तरी त्यातून बाहेर काढण्यास बऱ्यापैकी यश आले आहे. येत्या दोन महिन्यांत सुधारित प्रशासकीय मान्यता कोणत्याही परिस्थितीत मिळवून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल व प्रश्न मार्गी लागेल.
- आमदार चंद्रदीप नरके
सिंचन घोटाळा आणि विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यपालांनी महाराष्ट्रातील अपूर्ण प्रकल्पांचा निधी देण्यास असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे अडचणीचे ठरत आहे. वेळोवेळी आपण सरकारी बैठका व पक्षीय पातळीवरही हा प्रश्न उपस्थित केला असून, येत्या काही दिवसांत मार्ग निघेल. मात्र, आपण जनतेच्या या जीवनमरणाच्या प्रश्नावर जनतेबरोबर राहणार.
- आमदार प्रकाश आबिटकर
दृष्टिक्षेपात धामणी मध्यम प्रकल्प
एकूण क्षमता ३.८५ टी.एम.सी. पूर्ण मातीचे धरण
मूळ किंमत १२0३0 लक्ष रुपये, सध्याची ७५0 कोटींच्या पुढे
लांबी ९३३ मी., उंची ७८.0२ मी.
एकूण लाभ क्षेत्र १४00 हे. (तीन तालुक्यांतील)
मागील युती शासनाच्या काळात या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. सध्याही राज्यात युतीचे सरकार आहे. त्यांच्याच काळात प्रकल्प पूर्णत्वास
जाणार अशी धामणी खोऱ्यातील जनतेची अपेक्षा आहे.