कोल्हापूरकरांना दुष्काळाचे चटके ?
By Admin | Updated: July 3, 2014 01:01 IST2014-07-03T00:59:28+5:302014-07-03T01:01:44+5:30
चार दिवसांत पाणी कपात : पिके धोक्यात; दोन लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

कोल्हापूरकरांना दुष्काळाचे चटके ?
कोल्हापूर : महाराष्ट्रात सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. समाधानकारक पाऊस, सुपीक जमीन यामुळे कोल्हापूरकरांना कधी दुष्काळाची झळ बसलीच नाही. पण यावर्षी पावसाने दडी मारल्याने पहिल्यांदाच कोल्हापूरकरांना दुष्काळाचे चटके बसण्याची शक्यता आहे. अजून पाणी टंचाई जाणवत नसली तरी येत्यापाच दिवसांत पाणी कपातीचे संकटची शक्यता आहे.
हातकणंगले व शिरोळ तालुका वगळता जिल्ह्णात पंधरा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला. आतापर्यंत केवळ ४४ हजार ५०० हेक्टरवर (१६ टक्के) खरिपाची पेरणी झाली. यामध्ये भाताची धूळवाफ ३२ हजार ९१८ हेक्टर, ज्वारीची १६० हेक्टर, तूर ३८ हेक्टर, तर मूग ४१ व उडीदाची ५५ हेक्टरची पेरणी झाली. सोयाबीनची ६ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झालीे. पावसाने दडी मारल्याने पिके अडचणीत आली. पाण्याची सोय आहे, तेथे पिके अजून तरली आहेत. पण माळरान व हलक्या जमिनीतील पिके करपू लागली आहेत. अजून दोन लाख हेक्टरवरील भात, भुईमूग, नागली, सोयाबीन, ज्वारी, कडधान्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. (प्रतिनिधी)