ड्रेसकोडचा निर्णय चांगला, पण हवी स्वयंशिस्त; शासकीय कर्मचाऱ्यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:59+5:302020-12-15T04:39:59+5:30
कोल्हापूर : शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या व्यक्ती ग्रामीण भागातील, सर्वसामान्य व तळागाळातील असतात. त्यांच्यासमोर आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करताना ...

ड्रेसकोडचा निर्णय चांगला, पण हवी स्वयंशिस्त; शासकीय कर्मचाऱ्यांचे मत
कोल्हापूर : शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या व्यक्ती ग्रामीण भागातील, सर्वसामान्य व तळागाळातील असतात. त्यांच्यासमोर आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करताना कपडे व पेहरावाबद्दल जागरूक असले पाहिजे. हे होत नाही म्हणून राज्य शासनाला ड्रेसकोडचा नियम करावा लागला हे जाणून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे मत शासकीय कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड ठरविला असून, या निकषानुसार कार्यालयात जीन्स व टी शर्ट असा पेहराव करून येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नव्या नियमाबद्दल जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये संमिश्र मते आहेत.
नियम हवा, पण बंदीची सक्ती नको
कार्यालयात महिला आणि पुरुष एकत्रित काम करीत असतात. अशावेळी पुरुषांनी चुकीचा किंवा समोरच्या व्यक्तीला विचित्र वाटेल असा पेहराव केला की त्यांना सांगणे अवघड जाते. हेच महिलेच्या बाबतीत झाले तर अन्य महिला सहकारी त्यांना पेहरावाबाबत सूचना करू शकतात. सरकारी कार्यालयात येताना नागरिकाला मदतीची अपेक्षा असते. शासन म्हणून ते आमच्याकडे पाहत असतात याचे भान राखत जीन्स घातली तरी हरकत नाही. हे होत नाही म्हणून ड्रेसकोडचा नियम करावा लागला असला तरी एखाद्या कपड्यावर बंदीची सक्ती करू नये, असे मत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
--
सरकारी कर्मचाऱ्यांनी शोभेल असे सभ्य दिसेल असा पेहराव केला पाहिजे. आता फॅशनच्या नावाखाली कोणीही, कसेही कपडे घालून येतात, त्यामुळे ती व्यक्ती कर्मचारी आहे की, नागरिक आहे हे कळत नाही. ड्रेस कोडचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे अभिनंदनच केले पाहिजे.
अनिल लवेकर (सचिव, राज्य सरकारी कर्मचारी संघटना)
--
इंदुमती गणेश