अनाथांना मायेची ऊब देणारे द्रौपदीतार्इंचे घर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 23:56 IST2017-03-07T23:56:08+5:302017-03-07T23:56:08+5:30
मिरजेत उभारले सामाजिक कार्य : अठरा मुलांचा विवाह केला; नातेवाईक बनून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार

अनाथांना मायेची ऊब देणारे द्रौपदीतार्इंचे घर...
सचिन लाड --- सांगली --द्रौपदी जयवंत पिसाळ...मिरजेतील स्टेशन रस्त्यावर प्रताप कॉलनीत राहणारी एक साधी महिला...त्या दीड वर्षाच्या असताना आईचे छत्र हरपले. त्यांचा आजीने सांभाळ केला. रस्त्यावर भीक मागून जगल्या. गरीब आणि अनाथांचे दु:खणे काय असते, याचे चटके खाल्ल्याने त्यांचे अनाथ व वाट चुकलेल्या मुलांना आधार देण्याचे गेल्या २० वर्षांपासून कार्य सुरूआहे. १८ अनाथ मुलांचा त्यांनी स्वखर्चाने विवाहही केला. एवढे करून न थांबता बेवारस मृतदेहांच्या नातेवाईक बनून त्यांनी आतापर्यंत २९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
द्रौपदी पिसाळ मूळच्या सोलापूरच्या. लग्न झाल्यानंतर त्या मिरजेच्या झाल्या. मिरज स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर त्या कुटुंबासह राहतात. स्टेशनमधून बाहेर पडलेले सर्व प्रवासी त्यांच्या नजरेस पडतात. यामध्ये वाट चुकलेली, भेदरलेली मुलेही त्यांना दिसतात. मुलांना बोलावून त्या चौकशी करतात. पाच ते दहा वयोगटातील एक-दोन मुले सातत्याने त्यांना दिसतात. या मुलांकडे त्या चौकशी करतात. काहींना मराठी बोलता येत नाही. काही मुले चुकून रेल्वेतून आलेली असतात किंवा घरातील अडचणीमुळे बाहेर पडलेली असतात. काही मुलांना स्वत:चे नाव, गाव, पत्ता सांगता येत नाही, अशा मुलांना मायेचा आधार देण्याचे अनोखे कार्य त्या करतात. त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय त्या करतात. एवढ्यावर न थांबता त्या या मुलांना शिक्षणही देतात. यासाठी त्या पोलिसांची मदत घेतात. पोलिसांनीही द्रौपदीतार्इंच्या कार्याला अनेकदा सलाम केला आहे.
दहा वर्षांपूर्वी त्यांनी १८ अनाथ व वाट चुकलेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारले. यामध्ये पाच मुली व १३ मुले होती. सात ते दहा वयोगटातील या मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. शेवटी या मुलांना त्यांनी शिक्षण दिले. त्यांना मोठे केले. एवढ्यावर न थांबता या सर्व मुला-मुलींची त्यांनी मिरजेतच लग्ने लाऊन दिली. सध्या ही १८ मुले सुखाने संसार करीत आहेत. द्रौपदीताईंच्या कार्याचे अनेकजण कौतुक करतात. रस्त्यावर एखादे मूल बेवारस दिसले तर, त्या लोकांना फोन करून माहिती
देतात.
बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार!
द्रौपदी पिसाळ या मिरजेत कुठेही बेवारस मृतदेह सापडल्याचे समजताच घटनास्थळी जातात. पोलिसांना माहिती देतात. पोलिसांचा पंचनामा झाला की, मृतदेहाची विच्छेदन तपासणी केली जाते. त्यानंतर त्या मृतदेह ताब्यात घेतात. मृत व्यक्ती ज्या जातीचा आहे, त्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करतात. आतापर्यंत त्यांनी २९ मृतेदहांवर नातेवाईक बनून अंत्यसंस्कार केले आहेत. याची नोंदही त्यांनी ठेवली आहे. दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी त्या कधीही मागे-पुढे पाहात नाहीत.