लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कोरोना महामारीने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या स्थगित केलेल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप (कच्ची) मतदार यादी जाहीर केली आहे. १ ते ७ डिसेंबरला हरकती व १० डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होणार आहे. १० डिसेंबरनंतर सरपंच आरक्षण सोडतीची शक्यता असून जानेवारीत या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मुदत संपलेल्या ग्रामपंचायती बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पाच महिने ग्रामपंचायतीवर प्रशासक आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप (कच्ची) मतदार यादी जाहीर केल्याने आता ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार आहे. १० डिसेंबरनंतर सरपंच आरक्षण सोडत होण्याची शक्यता असून कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यास जानेवारीअखेर ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १ डिसेंबर २०२० ते ७ डिसेंबर २०२० पर्यंत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यामध्ये हरकती घेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सात डिसेंबर रोजी सुनावणी होणार असून १० डिसेंबर रोजी अंतिम यादी होणार आहे.
***
करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागणार त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
घानवडे, आमशी, कोपार्डे, कुडित्रे, खुपिरे, बालिंगा, पाडळी खुर्द, हळदी, देवाळे, कुरुकली, सडोली खालसा, भुयेवाडी, निगवे दुमाला, सांगवडे, वाडीपीर, नंदगाव, खेबवडे, वडकशिवाले, इस्पुर्ली, गिरगाव, गर्जन, घुंगरूवाडी, मांजरवाडी, तेरसवाडी, चाफोडी, दोनवडी, पाटेकरवाडी, म्हालसवडे, उपवडे, आरडेवाडी, खाटांगळे, वाघोबावाडी, आडूर, कळंबे तर्फ कळे, भामटे, साबळेवाडी, शिंदेवाडी, हणमंतवाडी, नागदेववाडी, पाडळी खुर्द, रजपूतवाडी, देवाळे, बेले, कोथळी, कुरुकली, येवती, कुर्ड, सडोली खा।, कारभारवाडी, भुयेवाडी, पडवळवाडी, केर्ली, शिये, गडमुडशिंगी, न्यू वाडदे, सांगवडे, हलसवडे, महे, कोगे, म्हारुळ, बाचणी, गाडेगोंडवाडी, आरे, धनगरवाडी, नांदगाव, कोगील खुर्द, कोगील बु।, तामगाव.