डॉ. वाईकर यांच्यावर तत्काळ कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:59+5:302021-06-01T04:17:59+5:30

कोल्हापूर : एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रोगाने थैमान घातले असताना अनेक डॉक्टर्स, नर्सेस देवदूतांप्रमाणे सेवा देत आहेत. परंतु, डॉ. ...

Dr. Take immediate action against Waiker | डॉ. वाईकर यांच्यावर तत्काळ कारवाई करा

डॉ. वाईकर यांच्यावर तत्काळ कारवाई करा

कोल्हापूर : एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रोगाने थैमान घातले असताना अनेक डॉक्टर्स, नर्सेस देवदूतांप्रमाणे सेवा देत आहेत. परंतु, डॉ. कौस्तुभ वाईकर आणि डॉ. अनुष्का वाईकर यांच्याविरोधात १० ते १२ तक्रारी असताना महापालिका प्रशासनाकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. रुग्णांची लूट करून आरोग्य यंत्रणा बदनाम करण्याचा प्रयत्न पुढील काळात खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला. तक्रारींच्या अनुषंगाने तपासणी करून दोषी आढळल्यास डॉ. वाईकर यांच्यावर कारवाई करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

रिंगरोड येथील सिद्धांत हॉस्पिटल संदर्भात तक्रारदार आणि महापालिका प्रशासन यांची सोमवारी बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीस क्षीरसागर यांनी सिद्धांत हॉस्पिटलबाबतच्या सर्व तक्रारी प्रशासक डॉ. बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

क्षीरसागर म्हणाले, सिद्धांत हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यापूर्वी त्यांच्यावर अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. कोविड काळात शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रुग्णांच्या नातेवाइकांकडून लाखोंची बिले वसूल केली जात आहेत. वाईकर यांच्या जुन्या प्राईम हॉस्पिटल रुग्णालयाचा ५० लाख घरफाळा थकीत आहे. नवीन सिद्धांत हॉस्पिटलमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्यापर्यंत इमारतीस परवानगी असताना चार माजली इमारत उभी केली आहे.

कोविड वॉर्ड तातडीने बंद : उपायुक्त

शासनाने दिलेल्या ॲपवर रुग्णालयांनी कोविड रुग्णांची माहिती भरणे आवश्यक आहे. सिद्धांत हॉस्पिटलकडून अशी कोणतीच माहिती सादर केलेली नाही. त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली. त्यावर त्यांनी कोणतेच उत्तर न दिल्याने त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला असून, या रुग्णालयातील कोविड वॉर्ड तातडीने बंद करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने दिला असल्याचे उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.

Web Title: Dr. Take immediate action against Waiker