शेती करायची की, सोडून द्यायची..?, तणनाशक, खतांच्या दरात दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 01:41 PM2022-05-12T13:41:46+5:302022-05-12T13:42:20+5:30

महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.

Doubling in the price of herbicides and fertilizers, | शेती करायची की, सोडून द्यायची..?, तणनाशक, खतांच्या दरात दुपटीने वाढ

शेती करायची की, सोडून द्यायची..?, तणनाशक, खतांच्या दरात दुपटीने वाढ

googlenewsNext

देशात महागाईने कहर केला आहे, त्यातून शेतीही सुटलेली नाही. खते, औषधांच्या किमतीत शेतकरी होरपळून गेला असून, शेती कसायची तर हातात पैसा नाही, साेडायची तर पोराबाळांच्या पाेटात काय घालायचे, असा यक्ष प्रश्न घेऊन शेतकरी शेतीचा गाडा ओढत आहेत. महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.

युद्ध दाेन परकीय देशांचे, त्याची झळ आपल्या देशातील जनतेला बसू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखाची; पण तेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडत आहेत, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधत आहेत. याचा परिणाम शेतीच्या अर्थकारणावर झाला असून, युद्ध जरी रशिया-युक्रेनमध्ये असले तरी भारतीय शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कृषिप्रधान देशात स्वातंत्र्यानंतर शेती एवढी आर्थिक आरिष्टात कधीच सापडली नव्हती. सरकार एकीकडे उत्पादनवाढीचा आग्रह धरत असताना दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणाऱ्या आनुषंगिक गोष्टीबाबत कमालीची उदासीनता दाखवली जात आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत कीटकनाशक, तणनाशक व खतांच्या दरात झालेल्या वाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेती करायची की सोडून द्यायची, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

आधुनिक शेतीकडे वळत असताना शेतीचा खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शेतात राबणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने यांत्रिकीकरण आले असले तरी त्यासाठी लागणारा खर्च काही कमी नाही. भांगलण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तणनाशकांचा वापर करावा लागत आहे. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत तणनाशकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर खतांनी मोठी झेप घेतली असून, बहुतांशी खतांचे दर १५०० रुपयांच्या पुढे आहेत. याचा एकत्रित परिणाम शेतीच्या अर्थगणितावर झाला आहे.

महागडी खते घालून उत्पादन किती घ्यायचे, असा प्रश्न आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीचे खते व तणनाशकांचा वापर करून पिकवलेले पीक काढणीपर्यंत टिकेल का, टिकले तर बाजारात योग्य भावात विकेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांकडे नाहीत. या सगळ्या कारणांमुळे शेती आतबट्ट्यात आली आहे.

तणनाशकांच्या दरात झालेली वाढ -

तणनाशक               पूर्वीचे दर    आताचे दर
ग्लॅफोसेल (१०० ग्रॅम)     ७०            १४०
२-४ डी ५८ (१ लिटर)   ३२०          ४२०
पॅराप्युले २४ (१ लिटर)    ३२०         ४२०
मेट्रीबिझोन (१०० ग्रॅम)    १२०          १८०
ॲट्रॉझिऑन (५०० ग्रॅम)   १५०         २२०

खते                   पूर्वीचा दर    आताचा दर प्रति पोते

सुफला -             ११७५         १५००
१०:२६:२६         ११८०         १४७०
१८:१८:१०         १०२५         ११९०
पाेटॅश                १०६०         १७००
अमोनियम सल्फेट   ८००           ११००
डीएपी               १२००          १३५०
एस. एस. पी.        ३००           ४५०

शेतीला इतके वाईट दिवस कधीच आले नव्हते. खते, बियाणे, वीज सगळ्यांची दरवाढ झाली. मात्र, आमच्या पिकांना हमीभाव नाही. आतबट्ट्यातील शेतीकडे नवीन पिढी येणार नाही. - सर्जेराव पाटील (शेतकरी, गडमुडशिंगी)

Web Title: Doubling in the price of herbicides and fertilizers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.