कोल्हापूर : दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल व राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी राधानगरीतील पदाधिकाऱ्यांना एकत्रित करत फोटोसेशन केले. वास्तविक काँग्रेस पक्षातून राज्यातील दिग्गज नेते इतर पक्षात गेले. राहुल व राजेश यांनी भविष्याचा वेध घेऊन निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी इतके हळवे होण्याची गरज काय? असा सवाल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.‘राष्ट्रवादी’ सभासद नोंदणी व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पक्षाच्या मार्केट यार्ड येथील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर अध्यक्षस्थानी होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, पाटील बंधूंच्या प्रवेशाने पक्षाला हत्तीचे बळ येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात नंबर वन करत असताना दोघांना ओट्यात घेतले आहे, त्यांचा सांभाळ प्रामाणिकपणे करू.भय्या माने आमदार झाल्यानंतर कागल सोडून निधी द्या, या बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या वक्तव्यावर बोलताना माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय होत आहे. आमदार निधीचे लगेच बोलू नका, आम्ही ग्रामीण भागातील माणसं आहोत, माळावर शड्डू ठाेकतोय. पण ‘बाबासाहेब’ बिचारा राबतोय, उद्याच्या निवडणुकीत (केडीसीसी) त्याला तेवढं बाजूला ढकलू नका.जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, माजी आमदार राजेश पाटील, भय्या माने, शहराध्यक्ष आदिल फरास, प्रा. किसन चौगले यांनी मनोगत व्यक्त केले.विधानसभेचे जिल्ह्यात १३ आमदारमतदारसंघाच्या पुनर्रचनेत जिल्ह्यात विधानसभेचे १३ मतदारसंघ होणार असल्याने शत्रू व मित्रही बदलणार आहेत. त्यामुळे कोणी फारसे मनावर न घेता सहकार्य करावे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.कोरे-आसुर्लेकरांचा दबाव‘केडीसीसी’ बँक अध्यक्षपदाचा आपण राजीनामा देणार असल्याचे समजताच, विनय कोरे लंडनवरून थेट मुंबईत आले आणि असे करणार असाल तर मैत्री तुटेल, असा दमच दिला. संचालक मंडळाच्या बैठकीत बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी राजीनामा न देण्याचा ठराव केला, हा माझ्या दृष्टीने सुखद धक्का असला तरी मतभेद मिटले पाहिजेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
बापाचा संकल्प पोरगा पूर्ण करेल‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ हे बैठकीला उशिरा आल्याबद्दल अभिनंदन करत, त्यांनी ‘गोकुळ’चे संकलनाचा २५ लाखांचा टप्पा पार करून बापाचा संकल्प पूर्ण करावा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
सभापतींचे कौतुकबाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी पदभार घेताच सेस चुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडल्याने समितीचा फायदा झाल्याबद्दल कौतुक करत त्यांनी आगामी काळात नजरेत भरेल असे काम करावे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.