कोल्हापुरात दवाखान्यास कोणी जागा देता का जागा, दहा आयुष्यमान आरोग्य केंद्रे पुढील तीन महिन्यांत सुरू करणार

By भारत चव्हाण | Updated: December 18, 2024 12:09 IST2024-12-18T12:08:46+5:302024-12-18T12:09:16+5:30

भारत चव्हाण  कोल्हापूर : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जास्तीत जास्त लाेकांना मोफत अथवा कमी खर्चात आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी ...

Does anyone provide space for a clinic in Kolhapur, Ten Ayushman Health Centers will be opened in the next three months. | कोल्हापुरात दवाखान्यास कोणी जागा देता का जागा, दहा आयुष्यमान आरोग्य केंद्रे पुढील तीन महिन्यांत सुरू करणार

कोल्हापुरात दवाखान्यास कोणी जागा देता का जागा, दहा आयुष्यमान आरोग्य केंद्रे पुढील तीन महिन्यांत सुरू करणार

भारत चव्हाण 

कोल्हापूर : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जास्तीत जास्त लाेकांना मोफत अथवा कमी खर्चात आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेअंतर्गत महानगरपालिका हद्दीत तेरा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने तर २८ नागरी आयुष्यमान आरोग्य केंद्रे मंजूर केली आहेत परंतु जागेअभावी हे दवाखाने सुरू करता आलेले नाहीत. त्यामुळे महापालिका आराेग्य विभागाला ‘दवाखान्यास कोणी जागा देता का जागा’असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेला नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर योजनेअंतर्गत २८ दवाखाने मंजूर केले आहेत. त्यापैकी कसेबसे आठ दवाखाने सुरू करता आले आहेत अजून वीस दवाखाने सुरु करायचे आहेत. दवाखाने सुरू करण्यास लागणारी सर्व यंत्रणा उदा. डॉक्टर्स, कर्मचारी, औषधे, रक्त लघवी तपासणीची उपकरणे राज्य सरकारकडून पुरविली जाणार आहेत. फक्त दवाखान्यासाठी लागणारी पाचशे चौरस फुटांची जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यायची आहे.

२८ पैकी आठ दवाखाने सुरू करण्यात आली असून त्याठिकाणी सर्व सुविधा मोफत दिल्या जात आहेत. अन्य वीस दवाखाने सुरू करण्याचा तगादा आरोग्य विभागाने महापालिकेकडे लावला आहे. परंतु केवळ जागेअभावी ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मंजूर असलेले दवाखाने सुरू करा अन्यथा गरज नाही, असे नमूद करून प्रशासकीय ठराव तयार करून पाठवावा, असा निर्वाणीचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

त्यामुळे पुढील तीन महिन्यांत काहीही करून अन्य दहा दवाखाने सुरू करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. त्याची कामे सुरू झाली आहेत. जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेची जागा उपलब्ध होणार नसेल तर जागा भाड्याने घेतल्यास महिन्याला द्यावे लागणारे भाडे देण्याची तयारी सरकारने दाखविली आहे.

दवाखान्यास नागरिकांचा विरोध

महापालिकेने राजेंद्रनगर व कनाननगर येथील स्वमालकीच्या हॉलमध्ये दवाखाने सुरू करण्याची तयारी सुरु केली होती. परंतु नागरिकांना त्याला कडाडून विरोध केला. ‘आम्हाला दवाखाना नको, आमच्या पद्धतीने हॉलचा वापर करु द्या’, असे नागरिकांनी प्रशासनाला सुनावले होते. दुर्दैव असे की, या हॉलचे उपयोग घरगुती कारणांसाठी, जेवणावळींसाठी केला जात आहे.

येथे मिळतात मोफत उपचार ..

सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, फिरंगाई, राजारामपुरी शाळा नं. ९, शुक्रवार पेठ, कसबा बावडा, महाडिक माळ, नेहरुनगर, फुलेवाडी, सदर बाजार, खोलखंडोबा हॉल, मोरे मानेनगर - शिवगंगा कॉलनी या नागरी आरोग्य केंद्रांतून मोफत औषधोपचार केले जात आहेत.

रक्त लघवी तपासणी येथे मोफत

लक्षतीर्थ, सानेगुरुजी, भोसलेवाडी, चांदणेनगर, अकबर मोहल्ला, शिवाजी पेठ कोरल अपार्टमेंट, सुर्वेनगर, पितळी गणपती या आठ ठिकाणी आयुष्यमान केंद्र सुरू करण्यात आली असून त्याठिकाणी रक्त, लघवी तपासणी, डिजिटल एक्सरे सुविधा केसपेपरसह मोफत आहेत.

ठाकरे दवाखान्यासही जागेचा अभाव

शहरात १३ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे, प्रत्यक्षात पाचच सुरु झाले आहेत. सात दवाखान्यांना जागा मिळालेली नाही.

Web Title: Does anyone provide space for a clinic in Kolhapur, Ten Ayushman Health Centers will be opened in the next three months.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.