लग्नकार्यातील खर्चाला फाटा...अनाथांना दिला मदतीचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:52+5:302021-01-13T05:04:52+5:30
कोल्हापूर: स्वत:चं लग्न म्हंटलं की, नटणं, श्रृंगार, साज, आलाच...या आनंदाच्या पर्वणीला होणाऱ्या खर्चाची मग कोणालाच मोजदाद नसते. ...

लग्नकार्यातील खर्चाला फाटा...अनाथांना दिला मदतीचा वाटा
कोल्हापूर: स्वत:चं लग्न म्हंटलं की, नटणं, श्रृंगार, साज, आलाच...या आनंदाच्या पर्वणीला होणाऱ्या खर्चाची मग कोणालाच मोजदाद नसते. मात्र, याच खर्चाला फाटा देऊन दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंदाचे रेशीमबंध बांधता येतात याचा प्रत्यय जयसिंगपूरचे डाॅ. स्वप्निल कणिरे आणि लातूरच्या डाॅ. प्रीती निठुरे यांनी दिला आहे. या उभयतांनी लग्नात होणारा अवाजवी खर्च टाळत त्यातील एक लाख रुपये लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथील एडस्ग्रस्तांच्या सेवालय -अनाथालय या संस्थेला देत सामाजिक बांधीलकीच्या गाठीही घट्ट जुळविल्या आहेत. लातूर येथील ही संस्था एचआयव्हीग्रस्तांच्या मुलांसाठी काम करणारी राज्यातील पहिली संस्था आहे.
जयसिंगपूर येथील डाॅ. स्वप्निल हे कोल्हापुरातील ॲपल हाॅस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे लातूर येथील डाॅ. प्रीती निठुरे यांच्याशी विवाह जुळला. या दोघांनाही लग्नात होणारा अवास्तव खर्च मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी हा खर्च कमी करुन यातील काही रक्कम समाजासाठी देण्याचा निर्णय घेतला. याची कल्पना त्यांनी दोन्ही कुटुंबीयांना दिली. विशेष म्हणजे त्यांनीही या निर्णयाला होकार दिला. ७ जानेवारीला सोलापुरात या दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने लग्नगाठीत अडकले. मात्र, याचवेळी त्यांनी यातील एक लाख रुपयांची रक्कम सेवालय एचआयव्ही अनाथालय संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांच्याकडे सुपूर्द केली.
पर्यावरणाचा आदर्श...
स्वप्निल आणि प्रीती यांनी आपले लग्नही पर्यावरणपूरक केले. लग्नात प्लास्टिकचा वापर होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली. विशेष म्हणजे आलेल्या नातेवाईकांनाही पर्यावरणाचा संदेश त्यांनी दिला आहे.