Disturbed by water, disturbed citizens, Tuljavani division type: Citizens' health is at stake | गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण, तुळजाभवानी प्रभागातील प्रकार

गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण, तुळजाभवानी प्रभागातील प्रकार

ठळक मुद्देगढूळ पाण्यामुळे नागरिक हैराणतुळजाभवानी प्रभागातील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याच मोबाईलवर तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

तुळजाभवानी मंदिर प्रभागातील ११ कॉलनींमध्ये तसेच साने गुरुजी वसाहतीमधील काही कॉलनींमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा १५ दिवस बंद पडला होता. त्यानंतर तो सुरू झाला; पण अनेकांच्या नळाद्वारे गढूळ पाणी येऊ लागले.

नळाला येणारे पाणी प्रक्रिया न करता थेट नदीतून उचलून सोडले जाते की काय, इतके लालभडक पाणी नळाला येते. कधीकधी काळपट पाणी येते. एखादी कळशी पाण्याने भरून ठेवली की संध्याकाळपर्यंत तिच्या तळाला तांबड्या मातीचा थर साचलेला असतो.


या गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गॅस्ट्रो तसेच अन्य पोटाच्या विकारांनी नागरिक हैराण होऊ लागले आहेत. खासगी दवाखान्यात उपचाराला येणाऱ्या दहापैकी आठ रुग्ण पोटविकाराचे आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पाण्यातील माती जाऊन नागरिकांचे फिल्टरही खराब होत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या गढूळ पाणी पुरवठ्याबाबत नागरिक प्रभागातील नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्याकडे तक्रार करीत आहेत. दिंडोर्ले हे संबंधित शाखा अभियंता यांच्याकडे तक्रार करतात. अधिकारी ऐकून घेतात; पण काम काहीच करीत नाहीत. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी त्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नगरसेवक दिंडोर्ले यांनीही अधिकाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गुरुवारी तर नगरसेवक दिंडोर्ले यांनी प्रभागातील नागरिकांना आयुक्तांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. पाणी गढूळ येणे, कमी दाबाने येणे, वेळेवर न येणे अशा प्रकारच्या तक्रारी होत असून मी वारंवार जल अभियंता, उपजल अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे; परंतु त्यांच्याकडून तितकासा प्रतिसाद मिळत नाही. आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणे गरजेचे आहे. पण त्या आधी नागरिकांनी आयुक्त यांच्याकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन दिंडोर्ले यांनी केले आहे.
 

 

Web Title: Disturbed by water, disturbed citizens, Tuljavani division type: Citizens' health is at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.