जिल्हा काँग्रेसमध्ये टोळी करून डावलले
By Admin | Updated: April 2, 2017 00:39 IST2017-04-02T00:39:58+5:302017-04-02T00:39:58+5:30
प्रकाश आवाडे : निर्णय घेतला नसता तर गट नेस्तनाबूत झाला असता

जिल्हा काँग्रेसमध्ये टोळी करून डावलले
इचलकरंजी : आवाडे गटाने घेतलेला निर्णय योग्य असून, त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. हा निर्णय आता घेतला नसता तर आमचा गट नेस्तनाबूत झाला असता. जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या दळभद्री नेत्यांनी टोळी करून आवाडेंना डावलले. त्याचा हिशेब चुकता करून आज जिल्हा परिषदेत आम्ही महत्त्वाच्या भूमिकेत आहोत, असे मत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.
कॉँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याच्या एकसष्टी समारंभानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाश आवाडे पुढे म्हणाले, आमच्या दोन सदस्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य एकत्रित असून, जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीतही आमची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालण्याचे दिवस गेले असून, आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. आम्ही नव्याने वाट तयार केली असून, त्या वाटेवरून वाटचाल करीत लवकरच त्याचा
हाय-वे केला जाणार आहे.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या नेतेमंडळींनी कॉँग्रेसची पार्श्वभूमी व इतिहास विसरला असल्याची टीका केली. तसेच जिल्हा कॉँग्रेसमध्ये इचलकरंजी कॉँग्रेसचे योगदान पूर्वीपासूनच मोलाचे राहिले आहे. याचा विसर पडल्याने तसेच व्यक्तीद्वेषातून डावलल्याची खंत व्यक्त केली.
यावेळी राहुल आवाडे, प्रकाश मोरे, अशोक आरगे, शशांक बावचकर, आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)