बर्कीच्या वन समितीस जिल्हास्तरीय वनग्राम पुरस्कार
By Admin | Updated: November 18, 2015 00:01 IST2015-11-17T23:52:59+5:302015-11-18T00:01:25+5:30
५१ हजारांचे पहिले बक्षीस : अंबपवाडी, कारिवडेचाही सन्मान

बर्कीच्या वन समितीस जिल्हास्तरीय वनग्राम पुरस्कार
कोल्हापूर : बर्की (ता. शाहूवाडी) येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीस संत तुकाराम वनग्राम जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. द्वितीय पुरस्कार अंबपवाडी (ता. हातकणंगले) येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीस जाहीर झाला असून, ही समिती ३१ हजार रुपये बक्षिसाची मानकरी ठरली. अकरा हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार कारिवडे (ता. भुदरगड) येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यातून सन २०१४-१५ मध्ये पुरस्कारासाठी एकूण नऊ समित्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांंच्याअध्यक्षतेखाली संत तुकाराम वनग्राम पुरस्कार जिल्हा निवड समितीने; सहभागी समित्यांच्या कामांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट तीन समित्यांची निवड केली.
राज्य शासनाने लोकसहभागातून वन व्यवस्थापन ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार कोल्हापूर वनविभागात ४४६ संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना झाल्याचे वन विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले.
वनांचे संरक्षण करणे, अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई, आदींना प्रतिबंध करणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडे वर्ग केलेल्या वनांचे व्यवस्थापन करणे, ग्रामीण जनतेमध्ये वनांच्या महत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे हे समितीचे काम आहे.
या समित्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून दरवर्र्षी उकृष्ट काम करणाऱ्या पहिल्या तीन समित्यांना जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे रोख स्वरूपात पुरस्कार बक्षीस देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.