Kolhapur Flood: जिल्हाधिकाऱ्यांनी पुराच्या नियोजनासाठी दिला अल्टिमेटम्, सूक्ष्म नियोजन करण्याच्या दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 12:06 PM2022-06-04T12:06:47+5:302022-06-04T12:08:08+5:30

सर्व शासकीय विभागांंनी करायच्या कामांची जबाबदारी निश्चित केली आहे.

District Collector gives ultimatum for flood planning, instructions for meticulous planning | Kolhapur Flood: जिल्हाधिकाऱ्यांनी पुराच्या नियोजनासाठी दिला अल्टिमेटम्, सूक्ष्म नियोजन करण्याच्या दिल्या सूचना

Kolhapur Flood: जिल्हाधिकाऱ्यांनी पुराच्या नियोजनासाठी दिला अल्टिमेटम्, सूक्ष्म नियोजन करण्याच्या दिल्या सूचना

googlenewsNext

कोल्हापूर : मागील दोन वर्षांमध्ये आलेल्या महापुराचा अनुभव घेऊन सर्व शासकीय विभागांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करा, नागरिकांच्या मदतीसाठी निर्माण कराव्या लागणाऱ्या सोयी-सुविधांची आताच तयारी करून ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही, अशी सूचना देत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी पुराच्या नियोजनासाठी सर्व शासकीय विभागांना अल्टिमेटम् दिला. बुधवारी (दि. ८) पुन्हा या विभागांचा आढावा घेतला जाणार आहे.

यंदा शंभर टक्के पाऊस होणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे. सर्व शासकीय विभागांंनी करायच्या कामांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्याबाबतचा आदेश २६ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्या आदेशानुसार व दिलेल्या जबाबदारीनुसार काम झाले आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची बैठक शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य, बीएसएनएल, महावितरण या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची चेकलिस्ट...

पूरबाधीत होणाऱ्या भागात खासगी बोअरवेल अधिग्रहण करणे, जिथे महिला कर्मचारी आहे त्यांच्या सोबतीला आणखी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती, धरणक्षेत्रावर अखंडित वीजपुरवठा, पूरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतरासाठीच्या जागा, त्यांना पिण्याचे पाणी, निवारा, जेवण, वैद्यकीय सेवा, जनावरांसाठी चारा पुरविणाऱ्या संस्था, पोकलँड, डंपर, जेसीबी पुरवणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत करार करणे यांसह पूरस्थितीत कराव्या लागणाऱ्या सगळ्या उपाययोजनांवर जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्देनिहाय आढावा घेतला.

सक्त सूचना

यावेळी काही विभागांनी अजूनही दिलेल्या जबाबदारीनुसार काम केलेले नसल्याचे लक्षात आले, तर काही विभागांचे काम अपूर्ण आहे, काही विभागांच्या नियोजनात त्रृटी आहेत हे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व विभागांना, तातडीने आपले काम पूर्ण करा, अशी सक्त सूचना देत अल्टिमेटम् दिला.

Web Title: District Collector gives ultimatum for flood planning, instructions for meticulous planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.