Kolhapur New Year 2026 Celebration: सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवारी रात्री बारापर्यंत पूर्वपरवानगीने साऊंड सिस्टीम सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. तसेच रात्री एकपर्यंत दारू विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी सांगितले.थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री १२ पर्यंत साऊंड सिस्टीम सुरू ठेवण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, यासाठी स्थानिक पोलिसांकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. दारू विक्रीची दुकाने आणि परमिट रूम बिअर बार रात्री एकपर्यंत सुरू राहणार आहेत. अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुरक्षित प्रवास आणि अमली पदार्थांची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर नाकाबंदी केली जाणार आहे. संशयित वाहनांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ओपन बारवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर बसून मद्यप्राशन करू नये. अन्यथा कारवाया करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक पाटील यांनी दिला.रात्री उशिरापर्यंत बंदोबस्तहुल्लडबाजांना रोखण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांसह दसरा चौक, ताराराणी चौक, पंचगंगा नदी घाट, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, बिंदू चौक, रंकाळा यासह उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त तैनात असेल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Kolhapur: थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत होणार धुमधडाक्यात; कोल्हापुरात साऊंड सिस्टीम, दारूविक्री किती वेळ सुरु राहणार.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:49 IST