यड्रावात जाचक पाणीपट्टीबाबत असंतोष
By Admin | Updated: February 23, 2015 00:16 IST2015-02-22T23:51:28+5:302015-02-23T00:16:07+5:30
ग्रामपंचायतीने पाणीपट्टी कमी करावी : पाणी वाटप नियोजनाच्या अभावाने नाराजी

यड्रावात जाचक पाणीपट्टीबाबत असंतोष
घन:शाम कुंभार - यड्राव -येथील स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाणीवाटपाचे नियोजन कोलमडले असतानाच पाणीपट्टी आकारणीच्या जाचक दरामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे नव्या योजनेच्या प्रारंभीच ग्रामपंचायतीस ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तर यातील योग्य नियोजन केल्यास ग्रामस्थांना पुरेसा व योग्य दाबाने पाणीपुरवठा करता येऊ शकेल. जाचक पाणीपट्टी कमी करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
यड्राव गावासाठी महत्त्वाकांक्षी पाणी योजना पूर्ण झाली आहे. परंतु योग्य नियोजनाच्या अभावामुळेच पाणीवाटप व्यवस्थेतील उपाययोजना सुलभ होत नाहीत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत आहे. बऱ्याच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काही भागात सदोष पाईपलाईन असल्याने तेथे पुरेसे पाणी जात नाही. तर विरोधी सदस्यांच्या भागामध्ये ग्रामपंचायतीकडून नव्या पाईपलाईन टाकूनही त्या जुन्या व्हॉल्वला जोडल्या नाहीत, तसेच पार्वती हौसिंग सोसायटीमध्ये पोट पाईपलाईन टाकण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जुनी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
डिसेंबर २०१४ व जानेवारी २०१५ या महिन्याचे ग्रामपंचायतीकडून प्रतिमहिना १८५ रूपये पाणीपट्टी आकारणीची बिले ग्रामस्थांना वाटप झाली आहेत. योजना सुरू झाल्यापासून नियमित पाणीपुरवठा नाही. तसेच पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने पाणी मिळत नसल्याने या दराबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. नळ पाणीपुरवठा केलेल्या हातकणंगले तालुका, शिरोळ तालुक्यातील गावामध्ये इतकी पाणीपट्टी नसल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
गावातील दोन्ही जलकुंभ भरण्यासाठी १० तासांचा कालावधी लागतो. परंतु १६ तास पाणी उपसा करावा लागत असल्याने उर्वरित सहा तासांचे पाणी कोठे जाते, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे. या पाण्याचा नाहक भुर्दंड ग्रामस्थांवर बसू नये व पाणीपट्टीची आकारणी माफक दरात करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
बऱ्याच भागात ठराविक वेळेपेक्षा जास्त पाणी सोडणे, काही भागात कमी पाणी सोडणे यावर बंधन घालणे आवश्यक आहे. सदोष पाईपलाईन त्वरीत बदलाव्यात म्हणजे योग्य दाबाने पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो. पाणी सोडण्याचा कालावधी सगळीकडे एकच असावा. एक दिवसआड पाणी ठराविक कालावधीतच सोडल्यास पाणीपुरवठ्याचे नियोजन होऊ शकते. ग्रामस्थांनाही पुरेसे पाणी मिळू शकते. यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा दर कमी करून इतर उपाययोजनाचे नियोजन करणे हितावह ठरणार आहे.
मीटरसक्ती ग्रामस्थांचा विरोध अन् ग्रामपंचायतीची भूमिका
नवीन पाणी योजनेसाठी ग्रा.पं.ने नळ कनेक्शनसाठी नळास मीटरसक्ती केली होती. त्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने मीटरसक्ती मागे घेतली. आता पाणीपट्टी जाचक ठेवण्यात आली आहे.
त्यासाठीही ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. यामुळे ग्रा.पं.ला योग्य भूमिका घ्यावी लागणार आहे. ग्रामस्थांचा विरोध अन् ग्रा.पं.च्या बदलत्या भूमिकेची चर्चा आहे.
पाणीपट्टी दर कमी होऊ शकतो
सध्या पंधराशे ग्रामस्थांनी नळ जोडणी करून घेतली आहे. त्यांना पाणीपट्टीची बिले लागू केली आहेत.
योजनेचा पाणीउपसा व ग्रामस्थांना वाटप याच्या खर्चाचा समतोल साधण्यासाठी योजनेमध्ये नळजोडणी जास्तीतजास्त ग्रामस्थांनी करून घेतली, तर पाणीपट्टीचा दर कमी होऊ शकतो, असे यड्रावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. आदलिंग यांनी स्पष्ट केले.