उपद्रवी चिलटांना हुशारीचा उतारा
By Admin | Updated: April 6, 2015 01:30 IST2015-04-06T01:27:33+5:302015-04-06T01:30:02+5:30
उन्हाळ्यामुळे उच्छाद : मच्छर आगरबत्ती, विषारी औषधं, लिक्विड मशीनलाही नाही जुमानणाऱ्या कीटकांवर स्वच्छता हाच उपाय; विविध मार्गांनी बंदोबस्त शक्य

उपद्रवी चिलटांना हुशारीचा उतारा
सातारा : अत्यंत क्षुद्र माणसाला चिलटाची उपमा देऊन दुर्लक्षित करण्याची प्रथा असली, तरी चिलट हा सहजी दुर्लक्षित होणारा प्राणी नाही. कितीही हाकललं तरी गूं-गूं करत डोळ्यापुढं पिंगा घालणाऱ्या या चिलटाचं ‘उपद्रवमूल्य’ सध्या भल्याभल्यांना कळून चुकलंय. स्वच्छता आणि साध्या-साध्या उपायांचा उताराच हा उपद्रव दूर करू शकतो, असं अनुभवी मंडळी सांगतात.
उन्हामुळे आणि सोसायटी, ग्रामपंचायत व जिल्हा बँक निवडणुकांमुळे सर्वत्र वातावरण तापलेलं असतानाच जिल्ह्यात चिलटांनी उच्छाद मांडला आहे. तगडे उमेदवार नवख्या उमेदवारांची ‘चिलट’ अशी संभावना करीत असले, तरी तेसुद्धा खऱ्या चिलटांच्या उपद्रवानं वैतागलेत. न चावता, रक्त वगैरे न शोषता केवळ वारंवार डोळ्यांपुढं येऊन लक्षावधी चिलटं ‘अस्तित्व’ दाखवत आहेत. मच्छर आगरबत्ती, विषारी औषधं, लिक्विड मशीन असल्या कोणत्याही उपायांना न जुमानणाऱ्या या कीटकापुढं सगळ्यांनी हात टेकलेत. तरीसुद्धा त्याच्या आगमनाचे मार्ग समजून घेऊन ते बंद करणं, आलेल्या चिलटांना ‘ट्रॅप’मध्ये पकडणं, असे काही मार्ग उपलब्ध आहेत. ‘फ्रूट फ्लाय’ (फलमक्षिका) किंवा नॅट (ॅल्लं३) या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या कीटकाच्या असंख्य प्रजाती आहेत. चिलटं फळांकडे आकर्षित होतात. आपल्या डोळ्यांवर ती सारखी-सारखी येतात, कारण अंडी घालण्यासाठी त्यांना ओलावा लागतो आणि आपले डोळे सतत ओलसर असतात. ओलावा कमी करणं हाच चिलटं कमी करण्याचा उपाय होय.
मंडईतून आल्यावर...
भाज्या घेऊन घरात जाण्यापूर्वी बाहेरच त्या धुऊन वेगळ्या टोपलीतून घरात घेऊन जाव्यात. भाज्या धुतलेलं पाणी घरापासून दूर फेकून द्यावं.
घरात आणल्यावर पुन्हा सिंकमध्ये धुऊन भाज्या थेट फ्रिजमध्ये ठेवण्याचा पर्याय उत्तम.
फळं आणली असतील तर त्यातील मऊ आणि पातळ सालीची फळं खाकी कागदाच्या पिशवीत ठेवून पिशवीचं तोंड बंद करावं. यामुळं अर्धपक्व फळं पिकायलाही मदत होते.
आणलेली फळं बास्केटमध्ये ठेवण्यापूर्वी आधीची जास्त पिकलेली, खराब झालेली फळं घरापासून शक्य तितक्या दूर फेकून द्यावीत.
स्वयंपाकघरातली दक्षता
ज्यूसचे जार, केचप-सॉसच्या बाटल्या उघडल्यानंतर पुन्हा बंद करताना त्यांची तोंडे स्वच्छ पुसून घट्ट झाकण लावा.
मांसाहारी स्वयंपाक केल्यावर धुण्यासाठी वापरलेलं पाणी, मांसाचे अवशेष घरापासून दूर फेकून द्या.
खरकटे अन्न, रस काढलेल्या फळांच्या साली थोड्या वेळासाठीही घरात ठेवू नका.
सिंकचे ड्रेनेज स्वच्छ राहील याची काळजी घ्या. सिंकचं पाणी वाहून नेणारी पन्हाळ सुस्थितीत ठेवा.
बाटल्या गरम पाण्यानं, ‘बोटल ब्रश’ वापरून साफ करा.
सांडलवंड झाल्यास लगेच साफसफाई करा.
फरश्या पुसल्यानंतर ते पाणी लगेच बाहेर फेका.
‘कॅच अँड रिलीज मेथड’
बरणी किंवा अर्ध्या कापलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत फळाची साल किंवा नासलेलं, अतिपक्व फळाचा तुकडा ठेवा. त्यावर थोडा व्हिनेगर टाकून ओलसर बनवा. कागदाचा शंकू करून तो बाटलीवर उलटा ठेवा. चिलटं शंकूतून फळाकडे आकर्षित होतात. एकदा आत गेल्यावर त्यांना पुन्हा बाहेर पडता येत नाही. भरपूर चिलटं बाटलीत गेली की त्याच शंकूतून पाणी ओतलं की चिलटांना बाटलीतच जलसमाधी!
‘जार ट्रॅप’
एका फळाच्या बाऊलमध्ये साल काढलेलं फळ आणि व्हिनेगर किंवा वाइन ठेवा. ‘व्हाइट वाइन’ आणि धणे यांचं मिश्रण अत्यंत उपयुक्त. या बाऊलला प्लास्टिकचा कागद वरून ताणून बांधा. सुरकुत्या पडू देऊ नका. या कागदाला सुईनं छोटी छिद्रं पाडा. त्यातून चिलटं आत जातील आणि तिथंच अडकून राहतील. त्यांना पुन्हा बाहेर पडता येऊ नये, इतकी छिद्रं लहान असायला हवीत.
कंपोस्ट खड्ड्याचा पर्याय
घराजवळ जागा असल्यास खोल खड्डा खणून खरकटे अन्न, खराब फळं, फळांच्या साली त्या खड्ड्यात टाकून पालापाचोळा किंवा मातीनं झाकून टाका. एक कप अमोनिया दोन गॅलन पाण्यात मिसळून त्यावर शिंपडा. अशा रीतीनं बागेसाठी खतही तयार होईल आणि चिलटांचा उपद्रवही कमी होईल. दारं-खिडक्यांना बारीक जाळ्या लावण्याचाही पर्याय आहेच.