‘स्वाभिमानी’च्या माघारीने चर्चेला ऊत

By Admin | Updated: July 21, 2014 00:40 IST2014-07-21T00:31:39+5:302014-07-21T00:40:31+5:30

‘दत्त-शिरोळ’ची निवडणूक : सा. रे. पाटील यांच्या मुत्सद्देगिरीची चर्चा

Discuss the issue of 'Swabhimani' | ‘स्वाभिमानी’च्या माघारीने चर्चेला ऊत

‘स्वाभिमानी’च्या माघारीने चर्चेला ऊत

संदीप बावचे - शिरोळ
श्री दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अर्जच दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारखान्याच्या इतिहासात पहिलीच बिनविरोध निवडणूक होणार असून, प्रमुख व पारंपरिक विरोधक खा. राजू शेट्टी यांनी अचानक या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयामुळे सभासद व शेतकरी वर्गातून उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे, तर कारखान्याचे अध्यक्ष आ. डॉ. सा. रे. पाटील यांनी विरोधकांवर मात करत निवडणूक बिनविरोध करून कारखाना हिताबरोबरच त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चर्चाही रंगली आहे.
खा. शेट्टी हे मूळचे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे. त्यांचा राजकीय उदय या कारखान्याच्या विरोधातूनच झाला आहे. २००३ साली दत्त कारखान्याच्या ऊस आंदोलनाच्या धुमश्चक्रीतूनच त्यांची तालुका व जिल्ह्याला ओळख झाली. यानंतरच त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. आंदोलनाला बळकटी येण्यासाठी राजकारणही तितकेच महत्त्वाचे, असे शेतकरी, मतदारांना पटवून देऊन त्यांनी जिल्हा परिषद व्हाया विधानसभामार्गे लोकसभेपर्यंत यशस्वी राजकीय मजल मारली.
दत्त कारखाना हा त्यांच्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे. गळीत हंगामापूर्वीचे ऊस आंदोलन असो, कारखान्याची सर्वसाधारण सभा असो की निवडणूक, खा. शेट्टी यांचा विरोध हा ठरलेलाच. कारखान्याच्या निवडणुकीने अप्रत्यक्षपणे सभासदांवर आर्थिक बोजा पडणार, हे निश्चित असले तरी, तसेच निवडणुकीत यश मिळणार नाही, हे माहीत असतानाही समाजासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत विरोधात राहून कारखाना व्यवस्थापनावर वचक ठेवल्याचे
खा. शेट्टी यांनी दाखवून दिले आहे.
कारखान्याच्या गतनिवडणुकीत शेट्टी यांच्या पॅनेलला यश मिळाले नसले तरी चांगली झुंज देत भविष्यातील निवडणुकीत आशेचा किरण त्यांनी निकालातून स्पष्ट केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेस, साखरसम्राट व संपूर्ण धनशक्ती विरोधात असतानाही शेट्टी विक्रमी मतांनी लोकसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेले. यातून त्यांच्यावर शेतकऱ्यांचा विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास अधिक आहे, हे दिसून येते.
अशा वातावरणातच ‘दत्त’ची निवडणूक लागल्याने ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते, शेतकरी, सभासदांचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे शेट्टी यांच्या पॅनेलला निवडणूक सोपी जाईल, अशी आशा सभासद, शेतकऱ्यांनी बाळगली असतानाच निवडणूक प्रक्रियेतूनच माघार घेतल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. त्यामुळे या माघारीतून कोणते साटेलोटे झाले आहे का? असा संतप्त सवाल ‘स्वाभिमानी’चे नेतृत्व मानणाऱ्या सभासदांतून व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे वयाच्या शंभरीच्या दिशेने वाटचाल करतानाही अत्यंत संयमाने आ. पाटील यांनी विरोधकांना बाजूला सारले व निवडणूक खर्चातून कारखान्याला वाचवीत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. या वयातही त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चर्चा अधिक रंगली आहे.

Web Title: Discuss the issue of 'Swabhimani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.