कोल्हापुरात विंचवाच्या नवीन प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध

By संदीप आडनाईक | Updated: February 7, 2025 14:22 IST2025-02-07T14:22:30+5:302025-02-07T14:22:57+5:30

कोल्हापूरसह सात जणांचे संशोधन : कृतज्ञता म्हणून डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव

Discovery of a new species of scorpion from Pattankodoli area of ​​Kolhapur district | कोल्हापुरात विंचवाच्या नवीन प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध

कोल्हापुरात विंचवाच्या नवीन प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली परिसरातून विंचवाच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात राज्यातील संशोधकांना यश मिळालेले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेत दिलेल्या अमूल्य योगदानाप्रति कृतज्ञता म्हणून ‘आयसोमेट्रस ज्ञानदेवाय’ असे नाव या प्रजातीस देण्यात आले आहे.

या संशोधन मोहिमेत सांगोला येथील महेश बंडगर आणि क्रांती बंडगर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ओमकार यादव आणि सौरभ कीनिंगे, दहिवडी कॉलेजचे डॉ. अमृत भोसले, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे देवेंद्र भोसले आणि कोल्हापुरातील आशुतोष सूर्यवंशी यांचा सहभाग आहे. हा शोधनिबंध दि. ३० ऑक्टोबर रोजी ‘जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित झाला आहे.

नव्याने शोधलेल्या प्रजातीचा समावेश ‘आयसोमेट्रस’ या कुळात केला आहे. या कुळातील विंचू मुख्यत्वे झाडांच्या खोडांवर वावरतात. पट्टणकोडोली परिसरातील नारळाच्या झाडांवर ही प्रजाती प्रथमतः महेश बंडगर, आशुतोष सूर्यवंशी आणि देवेंद्र भोसले यांना आढळली. पुढे डॉ. ओमकार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रजातीच्या रचनाशास्त्राचा आणि जनुकीय संचाचा सखोल अभ्यास केला. त्यातून ही प्रजाती कुळातील इतर प्रजातींहून वेगळी असल्याचे सिद्ध झाले. आकार, पृष्ठभागावरील आणि शेपटीवरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टिनल टीथची संख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचावरून ही प्रजाती कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ठरते.

‘आयसोमेट्रस कुळातील विंचू त्यांच्या झाडांच्या खोडांवरील वावरासाठी ओळखले जातात. ‘आयसोमेट्रस ज्ञानदेवाय’ ही प्रजाती शेताच्या बांधावरील झाडांवर आढळली. या विंचवांचा रंग झाडांच्या खोडांशी मिळताजुळता आहे, त्यामुळे हे विंचू सहजासहजी दिसून येत नाहीत. ते निशाचर आहेत. दिवसा झाडांच्या सालींखाली विश्रांती घेतात. - डॉ. ओमकार यादव, संशोधक.

Web Title: Discovery of a new species of scorpion from Pattankodoli area of ​​Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.