शिवाजी विद्यापीठात‘आव्हान’द्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By Admin | Updated: May 26, 2017 19:07 IST2017-05-26T19:07:41+5:302017-05-26T19:07:41+5:30
प्रशिक्षण शिबिराचा एक जूनला प्रारंभ; राज्यातील ‘एनएसएस’च्या १२०० स्वयंसेवकांचा सहभाग

शिवाजी विद्यापीठात‘आव्हान’द्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे ‘आव्हान’ या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरातून दिले जाणार आहेत. राज्यपालांच्या कार्यालयाच्या सूचनेनुसार यावर्षी दि. १ ते १० जूनदरम्यान विद्यापीठात हे शिबिर होणार आहे. यात राज्यातील विविध विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) सुमारे १२०० स्वयंसेवक, कार्यक्रमाधिकारी सहभागी होणार आहेत. नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास तिला कशा पद्धतीने सामोरे जावे, या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आव्हान प्रशिक्षण शिबिर घेतले जाते. राज्यपालांच्या कार्यालयाच्या सूचनेनुसार दरवर्षी राज्यातील एक विद्यापीठ या शिबिराचे संयोजन करते. गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. ५ ते १४ जूनदरम्यान ‘आव्हान’ झाले होते. यंदा या शिबिराचे संयोजन शिवाजी विद्यापीठ करीत आहे. शिबिरात पुणे येथील राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलातर्फे एनएसएसच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रात्यक्षिक आणि तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, ‘आव्हान’ची तयारी वेगाने सुरू आहे. यासाठी विविध २७ समित्यांच्या माध्यमातून काम सुरू असल्याचे विद्यापीठाच्या ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.
आव्हान’मधील विद्यापीठाची कामगिरी आव्हान या शिबिराचे संयोजन शिवाजी विद्यापीठाने सन २००७ मध्ये केले होते. यानंतर राज्यात विविध विद्यापीठांत झालेल्या या शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठाने यश मिळविले आहे. नागपूर येथे सन २०१४ मध्ये झालेल्या ‘आव्हान’मध्ये जनजागरण फेरीमधील उत्कृष्ट विद्यापीठाचा फिरता चषक पटकविला होता. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या शिबिरात विद्यापीठाने उत्कृष्ट संघनायक (डॉ. धनंजय लोहार) आणि उत्कृष्ट स्वयंसेवक (शिवाजी जाधव) या विभागात यश मिळविले होते.