‘गोकुळ’च्या संचालकांना डामडौल विसरावा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:24+5:302021-05-12T04:25:24+5:30
राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांच्या खर्चासह इतर कारभारावर नेत्यांचा अंकुश राहणार आहे. संचालक म्हटले ...

‘गोकुळ’च्या संचालकांना डामडौल विसरावा लागणार
राजाराम लोंढे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांच्या खर्चासह इतर कारभारावर नेत्यांचा अंकुश राहणार आहे. संचालक म्हटले की, जो डामडौल असायचा, तो आता विसरावा लागणार आहे. एकूणच कारभारातील काटकसर, व्यवस्थापनाला शिस्त, दूध वाढीसह इतर ‘ॲक्शन प्लॅन’ नेत्यांनी तयार केला असून, संघाच्या हिताला बाधा ठरेल, असे एकालाही काम करता येणार नाही, असा दमच नेत्यांनी संचालकांना दिला आहे.
जिल्ह्याच्या राजकारण व अर्थकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेवरील सत्तेला खूप महत्त्व आहे. येथील सत्तेचे पडसाद ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या राजकारणावर पडतात. म्हणूनच ‘गोकुळ’ ताब्यात घेण्यासाठी विरोधी आघाडीने मोट बांधली आणि त्यात यश मिळवले. पारदर्शी कारभार करून दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सभासदांना दिले आहे. त्यानुसार आता कारभार करावा लागणार आहे.
आमदारकी नको; पण ‘गोकुळ’चे संचालकपद हवे, अशी प्रतिमा समाजात निर्माण झाली आहे. त्याला कारणेही तशीच आहेत, निवडून गेले की, पाच वर्षांत संचालकाचा चेहरा-मोहराच बदलतो. नोकरभरती, विविध टेंडर या सगळ्यातून मिळणाऱ्या अर्थार्जनाची चर्चा सामान्य माणसात अधिक आहे. या सगळ्या प्रकारामुळे जिल्हा बँक आतबट्ट्यात आली होती, सत्तेवर येताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सगळ्या गोष्टींना फाटा देत एकूणच व्यवस्थापनाला शिस्त लावली आणि बँक पाच वर्षांत राज्यात आदर्शवत बनवली. ‘गोकुळ’ दूध संघ सक्षम आहे. मात्र, तेथील काही जुन्या प्रथांना पायबंद घालण्याची गरज आहे. काटकसर, व्यवस्थापनाला शिस्त लावत असतानाच दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर कसा द्यायचा, याचा ॲक्शन प्लॅन तयार केला खरा. मात्र, त्याची अंमलबजावणी त्याच ताकदीने झाली तरच सामान्य दूध उत्पादकांना चार पैसे जादा मिळतील.
नेतृत्वाच्या ‘विश्वासा’ची कसोटी
‘गोकुळ’च्या इतिहासात पहिल्यांदाच सभासदांनी परिवर्तन केले. विरोधी आघाडीच्या नेत्यांनी गेली पाच वर्षे केलेला संघर्ष, त्यातून सभासदांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले. आता सभासदांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत असताना त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता कारभार करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.
‘काळ बदलला... दृष्टिकोन बदलला’ होर्डिंग लक्षवेधी
‘गोकुळ’च्या संचालकांचे अभिनंदन करणारे होर्डिंग सध्या लक्षवेधी ठरत आहेत.‘ काळ बदलला... दृष्टिकोन बदलला, आता वर्तमान बदलू या, गोकुळ समृद्ध बनवू या.’ अशा प्रकारचे नवीद मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे अनेक होर्डिंग कारभाराची दिशा सांगून जातात.