दिलबहार (अ) उपांत्य फेरीत

By Admin | Updated: April 9, 2015 00:00 IST2015-04-08T23:35:53+5:302015-04-09T00:00:52+5:30

नेताजी चषक फुटबॉल : प्रॅक्टिस (अ)वर मात, करण चव्हाण-बंदरे, माणिक पाटील, सचिन पाटील यांचा वेगवान खेळ

Dilbahar (A) in the semifinals | दिलबहार (अ) उपांत्य फेरीत

दिलबहार (अ) उपांत्य फेरीत

कोल्हापूर : दिलबहार (अ)च्या करण चव्हाण-बंदरे, माणिक पाटील, सचिन पाटील या त्रिकुटाच्या वेगवान चालीमुळे प्रॅक्टिस क्लब (अ)वर ३-१ अशी मात करीत दिलबहार (अ)ने नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
शाहू स्टेडियम येथे बुधवारी दिलबहार(अ) व प्रॅक्टिस (अ) यांच्यात सामना झाला. प्रारंभापासून प्रॅक्टिस (अ)च्या अविनाश शेट्टी, नीलेश ढोबळे, ओंकार पाटील, हृषिकेश जठार, महेश पाटील यांनी वेगवान चाली रचत दिलबहार (अ)वर काही काळ दबाव निर्माण केला.
सहाव्या मिनिटास प्रॅक्टिस (अ)च्या अविनाश शेट्टी याच्या पासवर नीलेश ढोबळेने मैदानी गोल करीत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. एक गोलच्या ओझ्यामुळे दिलबहार (अ) संघातील माणिक पाटील, करण चव्हाण-बंदरे, सनी सणगर, जावेद जमादार, सचिन पाटील यांनी सामन्यात बरोबरी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न ‘प्रॅक्टिस’चा गोलरक्षक करण शिंदे व बचावफळीने निष्प्रभ ठरविले.
उत्तरार्धात दिलबहार (अ)च्या सचिन पाटील, माणिक पाटील, करण चव्हाण-बंदरे, जावेद जमादार, गणेश दाते यांनी वेगवान चाली रचत प्रॅक्टिस (अ)वर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना ६१ व्या मिनिटास यश आले. करण चव्हाण-बंदरे याने पेनल्टी क्षेत्रात मिळालेल्या संधीवर अप्रतीम फटका मारीत गोलची नोंद केली. या गोलमुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली.
सामना बरोबरीत आल्यानंतर पुन्हा ६५व्या मिनिटास करण चव्हाण-बंदरेच्या पासवर जावेद जमादारने प्रॅक्टिस (अ)वर मैदानी गोल करीत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. प्रॅक्टिस (अ)च्या अविनाश शेट्टी, नीलेश ढोबळे यांनीही सातत्याने दिलबहार (अ)च्या गोलक्षेत्रात धडक मारली. मात्र, त्यांना गोलरक्षक शोएब शेखच्या सजग गोलरक्षणामुळे संधी असूनही गोल करता आला नाही. ७६ व्या मिनिटास दिलबहार (अ)कडून माणिक पाटील याने वेगवान खेळ करीत गोलची नोंद केली. या गोलमुळे सामन्यात दिलबहार (अ)ने ३-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत राहिल्याने हा सामना दिलबहार (अ)ने ३-१ असा जिंकत उपांत्य फेरी गाठली.

Web Title: Dilbahar (A) in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.