डिझेल, वाहन चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 00:44 IST2017-03-09T00:44:53+5:302017-03-09T00:44:53+5:30
गांधीनगर पोलिसांची कारवाई : पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

डिझेल, वाहन चोरटे जेरबंद
गांधीनगर : गांधीनगर परिसरातील वाहन आणि डिझेल चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात गांधीनगर पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून पाच लाख ९८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती करवीर विभागाचे सहा. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत दिली.संजय ठाकूर (वय २५, रा. फुरसुंगीरोड, हारपळे वस्ती, हडपसर, पुणे), शंकर भुतपिल्ले (२०, रा. सानपाडा वाशी, मुंबई), किरण बेझ (२०, रा. सानपाडा वाशी, मुंबई) अशी या सराईत चोरट्यांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, २ मार्चला रात्री उचगाव येथील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजसमोरून टेम्पो चोरीला गेल्याची तक्रार सुजित भोळे (रा. उचगाव) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली होती. गांधीनगर पोलिसांनी पुणे व कोल्हापूर परिसरात चोरट्यांच्या शोधासाठी पथके पाठविली. दरम्यान, सहा.पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना खबऱ्यांमार्फत चोरटे हे पुण्याजवळील खेड-शिवापूर टोल नाक्याच्या अलीकडे सागर धाब्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी संशयित इंडिगो गाडीतून आले. त्यावेळी गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्सटेबल प्रदीप जाधव, नारायण गावडे, अमित सुळगावकर यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे एअर गन, चोरी करण्यासाठी वापरलेले स्क्रू-ड्रायव्हर, पक्कड, असे साहित्य मिळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्ह्यादरम्यान वापरलेली इंडिका कार ताब्यात घेतली. या सर्व संशयितांना घेऊन पोलिस गांधीनगरकडे रवाना झाले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, उचगाव येथील उभ्या असणारा टेम्पो (एमएच ०९ सीए १९९९) चोरून नेताना त्याच्यातील डिझेल संपल्याने तो उचगाव हायवेच्या पुलाखाली सोडून दिल्याची कबुली दिली. तसेच उचगाव येथील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस उभ्या केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीमधून सुमारे २०० लीटर डिझेल चोरल्याचेही कबूल केले. सदर संशयित हे अट्टल चोरटे असून, त्यांच्याकडून आणखीन चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पुणे ते सातारा, कोल्हापूर या भागातील वाहन चोऱ्यांशी यांचा काय संबंध आहे का? हे उघडकीस आणण्यासाठी इतर पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती सहा.पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
या मोहिमेत सहा. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस हेड कॉन्सटेबल प्रदीप जाधव, अमित सुळगावकर, राकेश माने, बाबासो कोळेकर, कृष्णात पिंगळे, नारायण गावडे, मुरलीधर रेडेकर, राजू भोसले यांनी सहभाग घेतला.
आठ दिवसांत छडा
गांधीनगर पोलिसांनी आठ दिवसांत चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश मिळविल्याने वाहनधारक व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच तपासकामी उचगावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी पोलिसांना मदत केल्याने त्यांचे कौतुक हर्ष पोद्दार यांनी केले.