भरतीत माणसे देताना डोंगळेंना संकलन आठवले नाही का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:07+5:302021-03-24T04:23:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात सहाशे कर्मचाऱ्यांची भरती ही विश्वास पाटील अध्यक्षपदी असतानाच झाल्याने, अरुण डोंगळे ...

भरतीत माणसे देताना डोंगळेंना संकलन आठवले नाही का?
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात सहाशे कर्मचाऱ्यांची भरती ही विश्वास पाटील अध्यक्षपदी असतानाच झाल्याने, अरुण डोंगळे यांनी भरतीबाबत त्यांनाच विचारावे. डोंगळे यांनी इतर संचालकांएवढेच कर्मचारी भरले आहेत; मग त्यावेळी दूध संकलन बारा लाख लिटर होते, याची जाणीव झाली नाही का? असा पलटवार ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मंगळवारी केला.
‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सोमवारी विरोधी शाहू आघाडीची घोषणा करण्यात आली, त्यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’च्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. दूध संघाचे संकलन बारा लाख असताना वीस लाख लिटर क्षमतेएवढी नोकरभरती केली. नेत्यांचा आदेश आला की मंजुरी दिली जायची, आदी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अध्यक्ष रवींद्र आपटे यांना विचारले असता, विश्वास पाटील अध्यक्ष असतानाच सहाशे कर्मचाऱ्यांची भरती झाली. त्यामुळे भरतीबाबत आम्हाला विचारण्यापेक्षा डोंगळेंनी त्यांनाच विचारावे. प्रसिध्दीच्या हव्यासापोटी काहीही बोलायचे योग्य नाही. इतर संचालकांच्या बरोबरीनेच डोंगळे यांनीही नोकर भरले, मग त्यांना त्यावेळी बारा लाख दूध संकलन आहे, याची जाणीव झाली नाही का? त्यांनी भरलेले कर्मचारी मागे बोलावणार का? याची उत्तरे डोंगळे यांनी द्यावीत. डोंगळे अध्यक्ष असताना नेत्यांचे आदेश येत नव्हते का? त्यावेळी कोणाच्या आदेशाने ते काम करत होते? अशी विचारणाही अध्यक्ष आपटे यांनी केली.
गाड्या विक्रीचा निर्णय महादेवराव महाडिक यांचाच
दूध संघाच्या संचालकांकडील गाड्यांबाबत टीका होते, त्यामुळे गाड्यांची विक्री करण्याचा सल्ला नेते महादेवराव महाडिक यांनीच ज्येष्ठ संचालकांच्या बैठकीत दिला होता. मात्र डोंगळे यांनी मिटिंगमध्ये येऊन गाड्यांचा मुद्दा आपलाच असल्याचे सांगत तो मांडल्याचे रवींद्र आपटे यांनी सांगितले.