‘डायल १०३’...हा नंबर अस्तित्वात नाही--आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार विरोधी दिन
By Admin | Updated: November 25, 2015 00:44 IST2015-11-24T23:43:54+5:302015-11-25T00:44:21+5:30
महिला अत्याचारविरोधी हेल्पलाईनचा फज्जा : अधिकारीही योजनेबाबत अनभिज्ञ; महिन्यात ८ ते १० तक्रारी

‘डायल १०३’...हा नंबर अस्तित्वात नाही--आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार विरोधी दिन
कोल्हापूर : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘फक्त १०३ नंबर डायल करा’ असा गवगवा करीत शासनाने हेल्पलाईन सुरू केली असली तरी ही हेल्पलाईन कोल्हापूर जिल्ह्यात महिलांना ‘होप’लेसच ठरत आहे. एखाद्या महिलेने मदतीसाठी लँडलाईनवरून या नंबरवर फोन केल्यास ‘हा नंबर अस्तित्वात नसल्याचा’ संवाद कानावर पडतो. अगोदरच खचलेल्या संबंधित महिलेच्या मानसिक त्रासात आणखीनच भर पडते; पण मोबाईलवरून या हेल्पलाईनवर फोन केल्यास प्रतिसाद मिळतो. मात्र, हा फोन ‘ट्रान्सफर’च्या गर्तेतच फिरत राहतो. हा सारा तांत्रिक विषय झाला तरी मुळात अशी ‘हेल्पलाईन’ असल्याची माहितीच अनेक महिलांना नसल्याचे सत्य आहे. त्यामुळे ही सुविधा महिलांना ‘हेल्प’ करण्यापेक्षा जादा अत्याचारच करणारी ठरत आहे.
‘१०३ नंबर डायल करा’ या हेल्पलाईन योजनेमुळे महिलेची अत्याचार व अन्यायाच्या जोखडातून सुटका होईल, हा शासनाचा मूळ उद्देश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही ही ‘हेल्पलाईन’ सुरू आहे. ती पोलीस नियंत्रण कक्षाला जोडली आहे; पण या विभागाकडे पोलिसांची अगर अधिकाऱ्यांची बदली म्हणजे निवांतपणा, अशीच व्याख्या रूढ होत आहे. कारण ‘१०३ नंबर’ची हेल्पलाईन योजना अस्तित्वात असल्याचे जिल्ह्यात कोणाला माहीतच नाही. काही मोजक्याच पोलिसांना या योजनेची माहिती आहे. याबाबत सोमवारपासून दोन दिवस या ‘१०३नंबर’वर लँडलाईनवरून फोन केल्यास ‘हा नंबर तपासून पाहावा’, ‘हा नंबर अस्तित्वात नाही’ असाच संवाद कानी पडतो. यावरून हा हेल्पलाईनचा नंबर गेले अनेक दिवस बंद असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे एखाद्या महिलेने या हेल्पलाईनवर फोन केल्यास तिला याचा मानसिक त्रासच सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने दाद मागायची तरी कुणाकडे? अशीच भावना या महिलांची हात आहे.
मात्र, याच हेल्पलाईनवर मोबाईलवरून कॉल केल्यास अवघ्या १५ ते २० सेकंदात प्रतिसाद मिळतो, पण त्या विभागातून मदत मिळण्यापेक्षा तो फोन ‘ट्रान्स्फर’मध्ये फिरत राहतो. त्यासाठी किमान काही मिनिटांचा अवधी जातो व नंतर ‘साहेब नाहीत’, ‘साहेबांना विचारावे लागेल,’ अशी असमाधानकारक उत्तर मिळतात. त्यामुळे तातडीच्या मदतीसाठी दाद मागतानाच संबंधित महिलेला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही हेल्पलाईन योजना त्यांच्यासाठी त्रासाचीच ठरत आहे.
याबाबत सोमवारी (दि. २३) दुपारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने या हेल्पलाईनवर मोबाईलवरून फोन केल्यानंतर येथील संबंधित पोलीस निरीक्षक जेवणासाठी गेल्याचे सांगण्यात आले, तर उपलब्ध असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकांनी त्रोटक माहिती दिली. त्यांनी हेल्पलाईनवर कॉल आल्यास तातडीची मदत हवी असेल तर नजीकच्या पोलीस ठाण्याला कळवून त्या ठिकाणी पोलीस पाठविले जातात; पण तातडीची मदत हवी नसल्यास हे प्रकरण महिला तक्रार निवारण कक्षाकडे पाठविले जाते, असे सांगितले.
प्रतिमहा फक्त ८ ते १० तक्रारी या हेल्पलाईनवर येतात, पण त्यात मोजक्याच तक्रारींचे निवारण होते. बाकी तक्रारी महिला तक्रार निवारणाकडे प्रलंबितच राहतात, अशी अवस्था आहे. यावरून ही हेल्पलाईन तातडीने मदतीसाठी कामी येण्याचे प्रमाण एकदमच अल्प आहे. (प्रतिनिधी)
अनभिज्ञता
‘१०३’ या हेल्पलाईन क्रमांकाबाबत सामान्य नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ‘हेल्पलाईन’साठी कॉल येण्याचे प्रमाण कमी आहे. महिला पोलिसांनाच याची माहिती नाही.
हेल्पलाईनची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये या हेल्पलाईनबाबत कार्यशाळा घेऊन पोलिसांना सजग केले जाते, असे फक्त सांगितले जाते; पण कधी कार्यशाळा घेतली, याची माहिती अधिकाऱ्यांना सांगता येत नाही.
हेल्पलाईनबाबत भित्तीपत्रके लावून जनजागृतीचे विशेष प्रयत्न केल्याचा दिखावा पोलीस खात्यामार्फत केला जात आहे.
हेल्पलाईनचा क्रमांक बद असणे किंवा तो सातत्याने व्यस्त लागणे अशा तांत्रिक गोष्टीकडे कधीही गांभीर्याने पाहिले गेले नाही.
महिला अत्याचाराविरुद्ध सुरू केलेला टोल फ्री नंबर १०३ हा उपक्रम तरुणी व महिलांसाठी मदतशील उपक्रम आहे; पण महिलांमध्ये त्याबद्दल अजूनही जागृती नाही. त्यासाठी हा उपक्रम तळागाळांतील महिला व मुलींपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
- पूनम पाटील, विद्यार्थिनी
या हेल्पलाईनद्वारे महिला व मुलींवरील अत्याचाराबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार तत्पर असेल, तर हा उपक्रम स्वागतार्ह आहे. मात्र, या नंबरची गरज महिलांना कधी पडूच नये, यासाठी महिला असो किंवा मुलींनी स्वत: सक्षम झाले पाहिजे, यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.
- अश्विनी गुरव, शिक्षिका
महाराष्ट्र शासनाने ‘डायल १०३’ टोल फ्री हेल्पलाईन नंबर सर्व महिलांसाठी उपयुक्त आहे; पण ही हेल्पलाईन प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी. प्रत्येक महिलांच्या समस्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आहे.
- प्रियांका साळुंखे, विद्यार्थिनी
महिला अत्याचाराविरोधात तक्रार करण्यासाठी असा कोणता हेल्पलाईन नंबर असतो, हे आताच कळते. जर अशा प्रसंगांबाबत तक्रार करण्यासाठी स्वतंत्र अशी हेल्पलाईन नंबर आहे, याबाबतच जर महिलांना व मुलींना माहीत नसेल, तर या ठिकाणी तक्रार केल्यानंतर काय प्रतिसाद मिळणार याबाबत प्रश्न निर्माण होतो.
- कोमल जाधव, विद्यार्थिनी
विभाग प्रमुखांचा क्रमांक ‘स्वीच आॅफ’
१०३ हेल्पलाईनच्या क्रमांकाचा गोंधळ असतानाच याबाबत माहिती घेण्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजता संबंधित विभागप्रमुखांना मोबाईलवर कॉल केला असता त्यांचाही मोबाईल बराचवेळ ‘स्वीच आॅफ’ होता.