सकल मराठा समाजाचे आज छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:36+5:302021-05-28T04:18:36+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने दोनदिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे, अशी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मागणी केली आहे. ...

सकल मराठा समाजाचे आज छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने दोनदिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे, अशी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मागणी केली आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज, शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले जाणार आहे. सकल मराठा शौर्यपीठातर्फे जिल्हास्तरीय आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि. २९) बैठक घेण्यात येणार आहे.
शिवाजीपेठेतील बैठकीमध्ये सकल मराठा समाजाने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत आंदोलन केले जाईल. आरक्षण आणि अन्य मागण्यांचे फलक घेऊन काळ्याफिती लावून मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होतील. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आंदोलन करण्यात येईल. त्यामध्ये शहरातील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आरक्षण रद्द झाल्याबद्दल यावेळी राज्य सरकारच्याविरोधात निर्दशने केली जाणार आहेत. जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवकांनी या आंदोलन सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक सुजित चव्हाण यांनी गुरुवारी केले. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीबाबतच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा शौर्यपीठातर्फे शनिवारी सायंकाळी पाच वाजता आझाद गल्लीतील विठ्ठल मंदिरामध्ये जिल्हास्तरीय बैठक होणार आहे. त्यामध्ये मराठा बांधव, समन्वयकांसमवेत चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती शौर्यपीठाचे समन्वयक प्रसाद जाधव यांनी दिली.