धनंजय महाडिक यांनी घेतली शरद पवार यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:35+5:302021-03-24T04:23:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. साखर ...

धनंजय महाडिक यांनी घेतली शरद पवार यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. साखर उद्योगासह ‘गोकुळ’ निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचे समजते. याबाबत धनंजय महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता, कोविडची परिस्थिती असतानाही ज्येष्ठ नेते शरद पवार हे माझ्या मुलाच्या लग्नाला आले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोट बांधली आहे, तर सत्तारूढ गटाने निवडणूक स्थगितीसाठी न्यायालयीन लढाई सुरू ठेवली आहे. अशा वातावरणात माजी खासदार धनंजय महाडिक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली. यामध्ये त्यांनी आपल्या भीमा साखर कारखान्यासह राजकीय चर्चा केल्याचे समजते. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू राहिली आहे. उच्च न्यायालयाने आदेश दिले असले तरी राज्य सरकार न्यायालयाला निवडणूक स्थगितीबाबत विनंती करू शकते. याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना सांगावे, अशी विनंती महाडिक यांनी पवार यांना केल्याचे समजते. त्याचबरोबर ‘गोकुळ’च्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे विरोधी गटासोबत गेले आहेत, त्यांनी सत्तारूढ गटासोबत यावे, यासाठीही पवार यांच्याकडे प्रयत्न केल्याचे समजते.