बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: कोट्यवधींचे उत्पन्न; तरी गैरसोयींचे ग्रहण

By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 4, 2023 11:59 AM2023-11-04T11:59:42+5:302023-11-04T12:02:04+5:30

भाविकांच्या श्रद्धेला भ्रष्टाचाराने पोखरले : गावाचा विकास शून्य

Devotees are inconvenienced even though they earn crores of rupees in Balumama Devalaya | बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: कोट्यवधींचे उत्पन्न; तरी गैरसोयींचे ग्रहण

छाया-आदित्य वेल्हाळ

इंदुमती गणेश

कोल्हापूर : श्री बाळूमामा देवालयाला भाविकांनी श्रद्धेने वाहिलेल्या कोट्यवधींच्या उत्पन्नाला भ्रष्टाचाराची वाळवी लागलेली असताना दुसरीकडे भाविकांनाच गैरसोयींचा सामना करत मामांचे दर्शन घ्यावे लागते. दुसरीकडे ज्या आदमापूरच्या पांढरीत हे देवस्थान आहे त्या गावच्याही परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. अतिक्रमणांनी व्यापलेल्या देवालय परिसरात अस्वच्छता आहे, भाविकांसाठी पुरेसे स्वच्छतागृह नाही, भक्तनिवासही अपुरे, चांगल्या आरोग्य सेवांचा अभाव, उड्डाणपुलाने तर वाहतुकीची कोंडी अधिकच वाढवली आहे. जिथे मामांनी देह ठेवला त्या मरगूबाई मंदिराचा परिसर गैरसोयींच्या गर्देत आहे. इतक्या गैरसोयी येथे असताना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसाठी देवालय जणू खासगी मालमत्ताच झाली.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बाळूमामा देवालयासमोरच अतिशय चुकीच्या पद्धतीने उड्डाणपुलाचे बांधकाम झाले आहे. त्यामुळे देवालयात जाण्यासाठी माेठा रस्ता, प्रवेशद्वार नाही. जो काही चिंचोळी रस्ता आहे तोही दोन्ही बाजूंनी छोट्या दुकानांच्या अतिक्रमणात गेला आहे. हे व्यावसायिक परगावहून आलेल्या भाविकांशी उद्धट वागतात असा अनुभव आहे. अतिक्रमणांमुळे वाहतुकीची काेंडी अजूनच वाढली आहे. पार्किंगचा मोठा प्रश्न इथे आहे. रविवार, अमावास्या व अन्य यात्रा उत्सवाला किमान ५ किलाेमीटर वाहतूक कोंडी होते. तासन्तास भाविक यात अडकून राहतात. देवालयाच्या अन्नछत्रसमोर अस्वच्छता आहे.

बाळूमामांनी जिथे देह ठेवला त्या मरगूबाई मंदिर परिसरात लाइट, पाणी, स्वच्छतागृह या मूलभूत सोयीदेखील नाहीत. बाळूमामा देवालयाशेजारी महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी आठ स्वच्छतागृह आहेत, जे अतिशय कमी आहेत. रविवार, अमावास्येला सर्व पाणंद रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य असते.

आदमापूरची स्थिती

आदमापूर हे २५०० लोकसंख्येचे गाव. वर्षाला लाखो भाविक बाळूमामांच्या दर्शनाला येतात, मोठी उलाढाल होते, ट्रस्टला कोट्यवधी मिळतात, हे बघता खरे तर गावाचा कायापालट होणे गरजेचे होते; पण वास्तव वेगळे आहे. आजही गावचा विकास झालेला नाही. शाळेची इमारत पडली आहे, चांगले रस्ते नाहीत, पाण्याची टाकी, स्थानिक व पर्यटकांना चांगल्या आरोग्यसेवा मिळत नाही. बेरोजगार तरुणांचा प्रश्न आहे, काही वर्षापूर्वी बेरोजगार तरुणांनी काही बग्ग्यांची जबाबदारी घेतल्याने त्यांच्या हाताला काम मिळाले, बग्ग्यांचेही उत्पन्न वाढले.

ट्रस्टने केलेल्या सोयी सुविधा

गेल्या २० वर्षात देवालय परिसरात काही सुधारणादेखील झाल्या आहेत. भाविकांसाठी दुपारी व सायंकाळी महाप्रसाद असतो. अन्नछत्रच्या वरच्या मजल्यावर मंगल कार्यालय आहे, ते भाविकांच्या निवासासाठी वापरले जाते. त्या शेजारीच दर्शन मंडप व हॉस्पिटलची मोठी इमारत आहे जी सध्या बंदावस्थेत आहे. पुढे मुरगूड रोडला १२० खोल्यांचे भक्तनिवास आहे. मात्र या सोयीसुविधा देवालयाचे उत्पन्न व भाविकांच्या दृष्टिकोनातूनही तोकडे आहे.

येथेही घोळच..

या तोकड्या सोयीसुविधा निर्माण करतानाही भ्रष्टाचाराची संधी सोडलेली दिसत नाही. इमारती बांधताना सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतली नाही, नियमानुसार सार्वजनिक बांधकामाकडून अंदाजपत्रके घेतली नाही, प्रशासकीय, तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, यातील कोणत्याही बाबींची पूर्तता केलेली नाही. इतर प्रकरणांप्रमाणे याच्याही नोंदी ट्रस्टकडे नाहीत.

Web Title: Devotees are inconvenienced even though they earn crores of rupees in Balumama Devalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.