महागाईचा आगडोंब उसळणाऱ्या भाजपला नेस्तनाबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST2021-07-04T04:16:51+5:302021-07-04T04:16:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल ...

महागाईचा आगडोंब उसळणाऱ्या भाजपला नेस्तनाबूत करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने तर हिमटोक गाठले असून, सामान्य माणसाला मेटाकुटीला आणणाऱ्या भाजपला नेस्तनाबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शहर कार्यालयासमोर चुली पेटवून जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारविरोधातील घोषणाबाजीने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, गेल्या सात वर्षांत देशातील जनतेला देशोधडीला लावण्याचे पाप नरेंद्र मोदी यांनी केले. आता पुरे झाले, सामान्य माणसाला उद्धवस्त करणाऱ्या या राज्यकर्त्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर म्हणाले, सामान्य माणसासाठी काम करणाऱ्या राज्यातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो. मात्र, राममंदिर जमीन खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा ईडीला दिसत नाही का? देशात जाती-जातींमध्ये भांडणे लावून आपली पोळी भाजून घेण्याचा उद्योग करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.
उद्योगपती व्ही. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अजित राऊत, मधुकर जांभळे, उत्तम कोराणे, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, सुहास साळाेखे, रमेश पोवार, प्रसाद उगवे, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, अनिल घाटगे , शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.
पडळकर कोल्हापुरात याच, हिसका दाखवतो
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणारे गोपीचंद पडळकर यांनी कोल्हापुरात यावेच, त्यांना कोल्हापुरी हिसका काय असतो, हे हातात घेऊन दाखवला जाईल, असा इशारा ए. वाय. पाटील व राजेश लाटकर यांनी दिला.
अनोख्या आंदोलनामुळे गर्दी
दहा-पंधरा महिलांनी चुली पेटवून त्यावर स्वयंपाक केला. चुलीवर तयार केलेले भाकरी, पिठलं आंदोलनानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना खाण्यास दिले. त्याचबरोबर ‘शतकवीर नरेंद्र मोदी’ असे भव्य डिजिटल उभे करून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्याने अनोखे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी झाली होती.