भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शहरातील ऐतिहासिक गांधी मैदान विकसित करून त्यामध्ये पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून शासनाच्या मूलभूत सेवा, सुविधा योजनेतून पाच कोटी निधी वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. यापैकी निम्मा निधी खर्च झाला आहे. मात्र सध्याच्या मान्सूनपूर्व पावसातच मैदानाला तलावाचे स्वरूप आले आहे. प्रचंड पाणी तुंबले आहे. यामुळे निधी नेमका कोठे मुरत आहे, असा प्रश्न उध्दवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे.शिवाजी पेठ परिसरात मैदान आहे. ऐतिहासिक असल्याने येथे अनेक बड्या नेत्यांची सभा झाल्या आहेत. नामांकित खेळाडूही तयार झाले आहेत. मात्र अलिकडे वळीव पडला तरी मैदानाला तळ्याचे स्वरूप येत आहे. म्हणून मैदान विकसित करणे आणि पाणी साठू नये, यासाठी उपाययोजना करण्यासाठी पाच कोटींचा निधी वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. यातून शिवाजी तरुण मंडळाच्या बाजूचे ड्रेनेजचे काम केले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या ड्रेनेजचे पाणी मैदानात येणार नाही. मात्र इतर ठिकाणांहून येणाऱ्या पाण्याचे काय असा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.
निधी मंजुरीच्या श्रेयासाठी पुढे पुढे करणारे..मैदानात पाणी साठू नये, यासाठी पाच कोटींचा निधी मीच आणला असे सांगत श्रेयासाठी पुढे पुढे करणारे आता मैदानात पाणी तुंबल्यानंतर गप्प का आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे.
मैदानाची रचना कपबशीसारखीमैदानाची रचना कपबशीसारखी आहे. खोलगट भागातील या मैदानात चारही बाजूने ड्रेनेज आणि जमिनीतून पाझरूनही पाणी येते. पावसाळा संपेपर्यंत पाणी तुंबून त्यावर शेवाळ तयार होते. भौगोलिक आणि नैसर्गिकदृष्ट्या मैदानातील संपूर्ण पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्व निधी खर्च झाला तरी पाणी साठूनच राहणार, असे मत महापालिकेचे संबंधित अधिकारी खासगीत व्यक्त करतात.
गांधी मैदानात ड्रेनेजचे पाणी येऊ नये म्हणून पाच कोटी निधीतून काम केले जात आहे. आतापर्यंत पन्नास टक्के काम झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणी साठण्याचे प्रमाण कमी होईल. - नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका, कोल्हापूर.