प्लँट असूनही गडहिंग्लजमध्ये ‘ऑक्सिजन’चा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:27+5:302021-05-08T04:25:27+5:30

राम मगदूम। गडहिंग्लज: ऑक्सिजन निर्मितीचा प्लँट सुरू झाल्यामुळे गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, अशी चर्चा होती, परंतु ...

Despite the plant, Gadhinglaj lacks oxygen | प्लँट असूनही गडहिंग्लजमध्ये ‘ऑक्सिजन’चा तुटवडा

प्लँट असूनही गडहिंग्लजमध्ये ‘ऑक्सिजन’चा तुटवडा

राम मगदूम। गडहिंग्लज: ऑक्सिजन निर्मितीचा प्लँट सुरू झाल्यामुळे गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, अशी चर्चा होती, परंतु या प्लँटमध्ये तयार होणारे ऑक्सिजन केवळ ३० रुग्णांनाच पुरते. त्यामुळे दररोज ८०-९० ऑक्सिजन सिलिंडर बाहेरून आणावे लागतात, असे येथील उपजिल्हा रुग्णालयातील सध्याचे चित्र आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही जिल्ह्यात ऑक्सिजनची प्रचंड टंचाई होती. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळातर्फे सुमारे ८० लाख रुपये खर्चून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याची क्षमता प्रतिदिनी १२० ते १५० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मितीची आहे. परंतु, सध्या रुग्णालयात कोविडचे १३५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ११० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे निर्माण होणारे ऑक्सिजन कमी पडत आहे. गडहिंग्लजसह चंदगड, आजरा, भुदरगड व कागल तालुक्यातील कोविडचे रुग्ण उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात येतात. त्यापैकी बहुतेक रुग्ण गंभीर स्थितीतील असतात. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन द्यावे लागते. त्याशिवाय अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर, हायफ्लोमशीन आणि बायपॅप मशीनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करून प्राण वाचवावे लागत आहेत. अलीकडील चार दिवसात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.

--------------------------

- कोविड समर्पित गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता - १०० बेड

- उपचार घेणारे रुग्ण - १३५ - ऑक्सिजनवरील रुग्ण - ११० --------------------------

* दुसरा प्लँट तातडीने उभारण्याची गरज: ऑक्सिजन जनरेशन प्लँटमधील ऑक्सिजन केवळ ३० रुग्णांनाच पुरते. दररोज ८०-९० ऑक्सिजन सिलिंडर कोल्हापूर, यड्राव, कागल व अन्य ठिकाणाहून आणावे लागतात. त्यामुळे प्रस्तावित दुसऱ्या ऑक्सिजन प्लँटची उभारणी तातडीने करण्याची गरज आहे.

--------------------------

* ऑक्सिजनची कमतरता का ? दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह येणारे रुग्ण अवघ्या तीन-चार दिवसातच गंभीर स्थितीत जात आहेत. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवावे लागत असून त्यांना दर मिनिटाला १० ते १५ लिटर ऑक्सिजन लागत असल्याने असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने ऑक्सिजन रिफिलींग प्लँटवरही रांगा लागत असल्याने कमतरता भासत आहे.

--------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्लँट.

क्रमांक : ०७०५२०२१-गड-१३

Web Title: Despite the plant, Gadhinglaj lacks oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.