पीक कर्जातून ठेवीचा गल्ला
By Admin | Updated: June 16, 2015 01:17 IST2015-06-16T00:58:03+5:302015-06-16T01:17:09+5:30
शेतकऱ्यांवर सुलतानी संकट : मुदतीनंतर ११ टक्के दराने व्याज आकारणी

पीक कर्जातून ठेवीचा गल्ला
दत्तात्रय पाटील - म्हाकवे -उसाची बिले वेळेवर न मिळाल्यामुळे आर्थिक अरिष्टात आलेल्या शेतकऱ्यांना आधारवड असणाऱ्या जिल्हा बँकेने आधार देण्याऐवजी त्यांना जोर का झटका देणाराच निर्णय घेतला आहे. पीक कर्जाच्या परतफेडीसाठी ३६५ दिवस (वर्षाची) मुदत असते; मात्र आर्थिक ओढाताणीमुळे हे कर्ज शेतकऱ्यांना भरता आले नाही आणि ३६६ वा दिवस उजाडला, तर त्यात बिनव्याजी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीच, त्याशिवाय सहाऐवजी तब्बल ११ टक्क्यांनी कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.
बँकेत ठेवीचा गल्ला वाढविण्यासाठी यापुढे मंजूर पीक कर्जाच्या पाच टक्के रक्कम ठेव म्हणून कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे उसाची बिले वेळेत नाहीत, इतर पीक आणि धान्यांनाही दर नाही, रोगराईचा वाढता प्रभाव यामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी एका संकटाचा खड्डाच खोदला जाणार असल्याने याबाबत शेतकऱ्यांसह संघटनांतून संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस सरकारने कर्जमाफीची योजना राबविली, तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतच्या पीक कर्जाला व्याज आकारणी न करता ही रक्कम त्याला वर्षभर वापरायला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सध्या ही योजना सुरू आहे. सेवा संस्था, जिल्हा बँक, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
मात्र, सेवा संस्थेसह कोल्हापूर जिल्हा बँक याचा पुरेपूर लाभ उठवत आहेत. काही सेवा संस्था शेतकऱ्यांकडून पाच ते दहा टक्क्यांपर्यंत बिनपरतीचे शेअर्स भांडवल अनामत रक्कम कपात करूनच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या हातावर ठेवते. विशेष म्हणजे या कपात केलेल्या रकमेसह मुद्दल व व्याजाची परतफेड शेतकऱ्यांना करावी लागते, तर आर्थिक गैरव्यवहाराचा शिक्का रोजच गडद करीत दिनक्रम सुरू असणाऱ्या जिल्हा बँकेकडे ठेवीदाराचा ओघ कमी झाला असून, बहुतांश ठेवीदार आपल्या ठेवी परत घेण्यासाठीच प्रयत्न करीत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारावर परिणाम होऊ नये यासाठी आता प्रशासनाने शक्कल लढवीत शेतकऱ्यांचा पीक कर्जातून पाच टक्के ठेव ठेवून घेण्याबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. त्यामुळे ही बाबच मुळात अन्यायकारक आहे.
दरम्यान, सेवा संस्थेसह जिल्हा बँकेने कपात केलेल्या ठेवीच्या रकमेच्या व्याजाचा भुर्दंडही संबंधित शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. तसेच एखाद्या शेतकऱ्याला मुदतीत कर्जाची परतफेड करता आली नाही तर त्यांच्याकडून सहा टक्क्यांप्रमाणे व्याज आकारणी केली जात होती. मात्र, आता यापुढे ११ टक्क्यांप्रमाणे व्याज आकारणी करण्यासंबंधी जिल्हा बँक प्रशासनाने विचारविनिमय सुरू केला आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ आज ना उद्या येतील या भाबड्या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांवर उजाडणारा दिवस संकटे घेऊनच येत असल्याच्या तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.
खते, कीटकनाशके, बी-बियाणे आणि मशागतीच्या खर्चासाठी आज आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही पीक कर्ज घेत आहोत. त्यामुळे या कर्जातून ठेवी घेणे ही बाबच दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. तसेच, आर्थिक सक्षमता होईल त्यावेळी आम्ही स्वत:हून बँकेत ठेवी ठेवू.
- काकासाहेब सावडकर,
शेतकरी, आणूर
पीक कर्जावर कृषी कर्जासाठी नाबार्डकडून आर्थिक पुरवठा केला जातो. त्यामुळे केडीसीसी बँकेने ठेवी कपात करण्याचा संबंधच नाही. ठेवीच्या कपातीसह थकीत शेतकऱ्यांना ११ ऐवजी पूर्वीप्रमाणेच सहा टक्क्यांप्रमाणे व्याज आकारणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारावे लागेल. - कॉ. संभाजी यादव, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा